अन्नपदार्थांत अळ्या सापडल्याबद्दल चौकशी समिती नेमणार : रजिस्ट्रार

रजिस्ट्रार सुंदर धुरी यांच्या कार्यालयात आंदोलन करताना भाजयुमोचे सदस्य. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : गोवा विद्यापीठाच्या हॉस्टेल मेसच्या जेवणात अळ्या सापडल्या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे पुन्हा त्याच्याकडे कंत्राट जाऊ नये यासाठी त्याला काळ्या यादीत टाकले आहे. याप्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती नेमली जाणार आहे. सोमवारपर्यंत विद्यापीठ परिसरातील अन्य दोन कॅन्टीन सुरू केले जातील, अशी माहिती विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुंदर धुरी यांनी दिली. मागील दोन दिवस विविध विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
रजिस्ट्रार धुरी यांनी सांगितले की, गुरुवारी मेसच्या जेवणात अळ्या आणि किडे सापडले होते. हा प्रकार दुर्दैवी होता. यानंतर आम्ही कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ बजावून दंड ठोठावला होता. शुक्रवारी सकाळी बैठक घेण्यात आली. आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा नाही. त्यामुळे आम्ही कंत्राटदाराला निलंबित करून काळ्या यादीत टाकले आहे. विद्यापीठातील अन्य दोन कॅन्टीनचे काम स्थानिक स्वयंसाहाय्यता गटांना देणार आहोत. ही दोन कॅन्टीन सोमवारपासून सुरू होतील.
ते म्हणाले, कंत्राटदाराला काढल्याने काही दिवस मेस बंद राहणार आहे. पैसे भरलेल्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुढील आठवड्यापर्यंत मेससाठी नवीन कंत्राटदार घेतला जाईल. कॅन्टीन समितीच्या सदस्य सचिवालाही ‘कारणे दाखवा’ बजावली जाईल. भविष्यात हॉस्टेल वॉर्डन, कॅन्टीन समितीच्या सदस्यांनी मेस, कॅन्टीनला रोज भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्वतःही कॅन्टीनमध्ये जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजयुमोचे ठिय्या आंदोलन
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबाबत संघटनेचे अध्यक्ष तुषार केळकर म्हणाले, तीन वर्षांपासून हॉस्टेल मेसच्या जेवणाबाबत तक्रारी आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी मेसवर छापा टाकला होता. त्यावेळी कंत्राटदाराने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही विद्यापीठाने त्याच्यावर कारवाई केली नाही. या प्रकरणी कॅम्पस समितीच्या सदस्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.