
मडगाव : कोकणी भाषा मंडळाचे प्राथमिक सदस्य दत्ता दामोदर नायक यांनी दिलेला राजीनामा स्वीकारायचा नाही, असा एकमताने निर्णय कोकणी भाषा मंडळाने घेतला आहे.
गुरुवार, ९ जुलै रोजी झालेल्या मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष सेराफीन कॉता यांनी सांगितले की, कोकणी चळवळ उभारण्यासाठी नायक यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या योगदानाचा आदर राखूनच मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यांचे योगदान हा आमच्या सामूहिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग असून, कोकणी चळवळीचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांची सोबत आवश्यक आहे.
अध्यक्ष कॉता यांनी स्पष्ट केले की, वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचे रूपांतर मनभेदात होऊ नये. मतभेदांवर खुल्या मनाने चर्चा करणे आणि त्यातून एकजूट साधणे हीच कोकणी चळवळीतील लोकशाही प्रणालीची मूळ भावना आहे.
कोकणीच्या संघर्षमय चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला केवळ मतभेदांमुळे स्वतःपासून दूर करणे कोकणी भाषा मंडळाला कधीही मान्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नायक यांनी कोकणी भाषा मंडळाला दिलेली देणगी परत घेण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा मनापासून आदर करतो आणि त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, असे कॉता यांनी सांगितले. कोकणी भाषा मंडळाचे संपूर्ण लक्ष आता भविष्यातील वाटचालीवर आहे. कोकणी चळवळीच्या या अखंड प्रवासात दत्ता दामोदर नायक यांचे यापुढेही सहकार्य आणि सोबत लाभेल, अशी आशा मंडळाने व्यक्त केली आहे.