पणजी :राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट होत असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘यूडीआयएसई प्लस’ अहवालातून समोर आले आहे. गेल्या एका वर्षात नऊ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या असून, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा सरकारी शाळांऐवजी विनाअनुदानित (खासगी) शाळांकडे वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सरकारी शाळांमधील प्रवेशात घट
अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये ४१,२१७ विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये, तर ४१,१४६ विद्यार्थ्यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, २०२५-२६ मध्ये सरकारी शाळांमधील प्रवेश घटून ४०,८९८ वर आला, तर विनाअनुदानित शाळांमधील प्रवेश वाढून ४१,८५२ झाला आहे.
याशिवाय, २०२४-२५ मध्ये अनुदानित शाळांमध्ये २ लाख १८ हजार १८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२५-२६ मध्ये हा आकडा २ लाख १४ हजार ५८७ वर आला आहे. एकूणच, गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३,२०९ ने कमी झाली आहे. सरकारी शाळांमधील प्रवेशाचे प्रमाणही ०.७७ टक्क्यांनी घटले आहे.
विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असतानाच राज्यातील एक शिक्षकी शाळांचे चित्रही बदलले आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यात ६२ शाळा अशा होत्या, जिथे केवळ एकच शिक्षक कार्यरत होता. मात्र, २०२५-२६ मध्ये अशा एकाही शाळेची नोंद नसल्याचे यूडीआयएसई प्लस अहवालात नमूद करण्यात आले आहे.


