पणजी :अनुसूचित जमातीच्या (एसटी) नागरिकांना घर खरेदी करण्यासाठी किंवा घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजनेअंतर्गत कमाल १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने जारी केली असून, वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
घर नावावर करण्यासाठी आर्थिक आधार
सरकारी, कोमुनिदाद तसेच खासगी जागेवरील अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी सरकारने ‘माझे घर’ योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, जागा खरेदीसह विविध शुल्कांचा खर्च परवडत नसल्याने एसटी प्रवर्गातील अनेक नागरिकांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना जाहीर केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये घर नावावर करण्याचा आदेश, भरलेल्या शुल्काच्या चलनाची प्रत, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (एसटी सर्टिफिकेट), उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड, घराचा फोटो तसेच बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे.


