Home >> ताज्या बातम्या >> बोगस प्रमाणपत्रांचा धक्का; दोन अधिकारी अडचणीत

बोगस प्रमाणपत्रांचा धक्का; दोन अधिकारी अडचणीत

दक्षता चौकशीत दोषी; कारवाईची फाईल सरकारकडे प्रलंबित


07th July, 11:42 pm
बोगस प्रमाणपत्रांचा धक्का; दोन अधिकारी अडचणीत

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी दक्षता संचालनालयाने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन अधिकारी दोषी आढळल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील कारवाईसंदर्भातील फाईल सध्या सरकारकडे प्रलंबित आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये फेरफार असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
दक्षता संचालनालयाकडे एका कनिष्ठ सेवा अधिकाऱ्याविरुद्ध तसेच एका अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कनिष्ठ सेवा अधिकाऱ्याने नोकरीसाठी बनावट ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार होती, तर अधिकाऱ्याने बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. दक्षता संचालनालयाने संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकून प्राथमिक चौकशी पूर्ण केली आणि अहवाल सरकारकडे सादर केला. अधिकाऱ्याची फाईल संबंधित मंत्र्यांकडे असून, कनिष्ठ सेवा अधिकाऱ्याची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करायची की थेट कारवाई करायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणे किंवा सरकारी सेवेत बढती मिळवणे हा गंभीर प्रकार मानला जातो. सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.
बनावट ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राद्वारे बनला जेएसओ
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा कोटा आहे. कनिष्ठ सेवा अधिकारी (जेएसओ) पदासाठी एका उमेदवाराने ईडब्ल्यूएस आरक्षणांतर्गत अर्ज केला होता. परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्याने त्याची निवड झाली.
त्याच्या मालमत्तेची तपासणी केल्यानंतर तो ईडब्ल्यूएस गटासाठी पात्र नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीत त्याच्या वडिलांच्या नावावर शेतीजमीन तसेच इतर मालमत्ता असल्याचे समोर आले. त्यामुळे चुकीची माहिती देऊन त्याने ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले.
सरकारने ईडब्ल्यूएस पात्रतेचे निकष स्पष्ट केले असून संबंधित उमेदवार त्यात बसत नसल्याने त्याने सादर केलेले प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.
बनावट पदवी प्रमाणपत्राद्वारे मिळवली बढती
एका खात्यात सुमारे ३५ वर्षांपूर्वी नियुक्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने पदवी प्रमाणपत्राच्या आधारे अधिकारीपदापर्यंत बढती मिळवली होती.
त्याने सादर केलेले पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार दक्षता संचालनालयाकडे दाखल झाली होती. संबंधित अधिकारी सेवेत रुजू झाला, तेव्हा तो पदवीधर नव्हता. नंतर त्याने पदवी मिळविल्याचा दावा केला आणि त्यानंतर अनुभवाच्या आधारे त्याला अधिकारीपदाची बढती मिळाली.
दक्षता संचालनालयाने त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी केली. त्याने ज्या विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र सादर केले होते, त्या विद्यापीठाकडेही पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र तेथून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्याने बढतीसाठी सादर केलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे वैध नसल्याचा प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष आहे.