विधानसभेचा आखाडा : थिवी

अंतर्गत वाद शमवण्याचे भाजपसमोर आव्हान
मनोज परबांच्या अनुपस्थितीत आरजीपीची परीक्षा
किरण कांदोळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
एमआयटी प्रकल्पाचे बांधकाम ठरणार कळीचा मुद्दा
गोवन वार्ता
म्हापसा : थिवी मतदारसंघात सलग तीनवेळा विजयी होत हॅट् ट्रिक साधण्याची आणि माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना आहे. मात्र त्यांच्यासमोर काँग्रेस, तसेच माजी आमदार किरण कांदोळकर आणि भाजपमधील अंतर्गत राजकारणाचे आव्हान आहे.
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी थिवी मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. सातवेळा त्यांनी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आहे. यावेळी आठव्यांदा निवडणुकीत ते उतरणार आहेत. हॅट् ट्रिकसह चौथ्यांदा आमदार होण्याची संधी त्यांना आहे.
या मतदारसंघातून यापूर्वी फक्त माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी हॅट् ट्रिक साधली असून पाचवेळा विजयी होण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. नार्वेकर हे मगोच्या तिकिटावर प्रथम निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर चारवेळा विजयी झाले होते. मंत्री हळर्णकर हे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व गेल्यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडून येत आमदार बनले आहेत. आम आदमी पक्षाचे कार्य थिवी मतदारसंघात दिसून येत नाही.
थिवी हा मतदारसंघ आठ पंचायत क्षेत्रांत विभागलेला आहे. यामध्ये कामुर्ली, कोलवाळ, रेवोडा, नादोडा, पिर्ण, अस्नोडा, सिरसई व थिवी यांचा समावेश आहे. बार्देशला पेडणे आणि डिचोली तालुक्याशी जोडणारा हा मतदारसंघ असून दळणवळणासाठी महत्त्वाचे असे थिवी रेल्वे स्थानक आणि गोवा-मुंबई व गोवा-बेळगाव हे राष्ट्रीय महामार्ग हे याच मतदारसंघातून जातात.
गोव्याची विजेची गरज भागवणारा पाॅवरग्रीड प्रकल्प, उत्तर गोव्यात वीजपुरवठा करणारे थिवी वीज उपकेंद्र, बार्देश तालुका आणि डिचोलीतील काही भागांना पाणीपुरवठा करणारा अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प, कोलवाळ आणि थिवी औद्योगिक वसाहत, असे थिवी मतदारसंघात महत्त्वाचे प्रकल्प आहेत. गेल्या पाच वर्षांत रोजगार निर्मितीचा एकही प्रकल्प उभा राहिलेला नाही. थिवी कान्सा टेकडीवर एमआयटी या खासगी शिक्षण संस्थेच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तरीही स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे.
म्हापसा ते डिचोली या महामार्गावर थिवी ते अस्नोडा दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नी अस्नोडा बायपास रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र थिवी ते सिरसईपर्यंतच्या अरुंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा थिवी रेल्वे स्थानकावर थांबा घेणाऱ्या पाटना ते गोवा रेल्वे गाडीमुळे सकाळच्या वेळी सिरसई येथील जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी, करासवाडा ते कोलवाळ दरम्यानच्या महामार्गावरील अपूर्ण सर्व्हिस रस्ता, बेकायदा भंगार अड्डे, कोमुनिदाद जागेतील घरे, तसेच बेरोजगारी, रस्त्याकडेच्या व्यावसायिक आस्थापनांवरील कारवाईचा बडगा, कचरा व्यवस्थापन, यासारख्या समस्या थिवी मतदारसंघाला भेडसावत आहेत.
तानावडे-हळर्णकर यांच्यातील राजकारणाचा भाजपला तोटा
आगामी निवडणुकीत भाजपतर्फे नीळकंठ हळर्णकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र विद्यमान राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांचे बंधू संदीप शेट तानावडे भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. संदीप शेट हे सध्या पिर्णचे सरपंच आहेत. खासदार तानावडे यांनीदेखील आपल्या भावाला तिकीट मिळावे म्हणून पक्ष पातळीवर प्रयत्न चालवले आहेत. हळर्णकर आणि तानावडे यांच्या या अंतर्गत राजकारणामुळे गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत थिवी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता.
किरण कांदोळकरांच्या पक्षाबाबत उत्सुकता
माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सध्या थिवी मतदारसंघावरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. गत निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून कोलवाळ जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या पत्नी कविता कांदोळकर यांना अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणुकीत उतरवले होते व स्वत: हळदोणा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळीच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत कोलवाळ मतदारसंघातून कविता कांदोळकर या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसला रामराम केल्यानंतर किरण कांदोळकर यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. सध्यातरी कांदोळकर हे या मतदारसंघात वैयक्तिकरित्या राजकीय व सामाजिक कार्य करत असून अपक्ष की एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरतील, हे निवडणूक जवळ आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसकडून शिवदास कांबळी आग्रही
काँग्रेस पक्षातर्फे यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्यास थिवी मतदारसंघातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि थिवीचे विद्यमान पंच शिवदास कांबळी व विद्यमान सिरसईचे जिल्हा पंचायत सदस्य नीलेश कांबळी इच्छुक आहेत. पक्षातर्फे मागील निवडणूक लढवण्यास शिवदास कांबळी हे इच्छुक होते; परंतु पक्षाने उद्योजक अमन लोटलीकर यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसून आला नव्हता. त्यामुळे यावेळी निष्ठावंत आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी थिवी गट समितीने काँग्रेस नेत्यांकडे करून माजी सरपंच शिवदास कांबळी व जिल्हा पंचायत सदस्य नीलेश कांबळी यांच्या नावांना पसंती दिली आहे.
मनोजच्या अनुपस्थितीमुळे आरजीपीची ताकद घटली
२०२२ च्या निवडणुकीवेळी नवोदीत पक्ष आरजीपीने थिवी मतदारसंघात मोठे मताधिक्य घेतले होते. पक्षाचे तत्कालीन प्रमुख तुकाराम (मनोज) परब यांच्यामुळे आरजीला ५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. पण मनोज परब यांनी पक्षातील अंतर्गत वादातून आरजीपीसह राजकारणातून संन्यास घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील आरजीचा दबदबा थोडाफार कमी झाला आहे.
थिवी मतदारसंघातील आमदार
१९६३ : शंभू पालयेकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९६७ : जयसिंगराव राणे (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९७२ : पुनाजी आचरेकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९७७ : दयानंद नार्वेकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९८० : दयानंद नार्वेकर (काँग्रेस)
१९८४ : दयानंद नार्वेकर (काँग्रेस)
१९८९ : विनायक नाईक (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
१९९४ : दयानंद नार्वेकर (काँग्रेस)
१९९९ : दयानंद नार्वेकर (काँग्रेस)
२००२ : सदानंद शेट तानावडे (भाजप)
२००७ : नीळकंठ हळर्णकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
२०१२ : किरण कांदोळकर (भाजप)
२०१७ : निळकंठ हळर्णकर (काँग्रेस)