Home >> ताज्या बातम्या >> १५ दिवसांत १ कोटींच्या मालमत्तांची ‘पडझड’

१५ दिवसांत १ कोटींच्या मालमत्तांची ‘पडझड’

झाडे पडल्याचे १,०८८ कॉल : अग्निशामक दलाला २.१९ कोटींची मालमत्ता वाचवण्यात यश


07th July, 11:24 pm
१५ दिवसांत १ कोटींच्या मालमत्तांची ‘पडझड’

सत्तरी तालुक्यात रस्त्यावर कोसळलेले झाड हटवताना अग्निशामक दलाचे जवान.
प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : मागील काही दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. असे असले तरी राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या घटनांची संख्या वाढली आहे. यामध्ये रस्त्यांवर, वीज खांबावर, घरांवर आणि वाहनांवर झाडे अथवा फांद्या पडून झालेल्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. मागील पंधरा दिवसांत अग्निशामक दलाला झाडे पडल्याशी संबंधित १,०८८ कॉल आले. या घटनांमध्ये १.०७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर अग्निशामक दलाला २.१९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीशी संबंधित १७४ घटनांची नोंद झाली. यामध्ये सुमारे २४ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मंगळवारी राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली. २४ तासांत १.१९ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान सांगेमध्ये ३.७९ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात १ जून ते ७ जुलै दरम्यान सरासरी ३४.३९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण २४.६ टक्क्यांनी कमी आहे. राज्यात १ जून ते ७ जुलै दरम्यान काणकोणमध्ये सर्वाधिक ४८.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. धारबांदोडामध्ये ४१.१४ इंच, मडगावमध्ये ३८.९२ इंच, सांगेमध्ये ३६.३२ इंच, फोंडामध्ये ३५.५१ इंच, वाळपईमध्ये ३६.०४ इंच पावसाची नोंद झाली आहे.
धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
राज्यात जून महिन्यात सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मात्र सध्या राज्यात जोरदार पावसाची सरी कोसळत असल्याने विविध धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ७ जुलै अखेरीस गावणे धरणात ६९ टक्के, आमठाणे धरणात ६५.९ टक्के, चापोलीमध्ये ५३.९ टक्के, साळावली धरणात ४२.५ टक्के, तिळारीमध्ये ४३.३ टक्के, पंचवाडीमध्ये ३६.९ टक्के, तर अंजुणे धरणात २१.५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.