तरुणीची प्रकृती चिंताजनक : संशयित गौतम देविदासला अटक

धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानंतर तुये येथील आरोग्य केंद्रातील परिचारिका विघ्नाली यांना उपचारासाठी नेताना कर्मचारी आणि नागरिक.
गोवन वार्ता विशेष प्रतिनिधी
पेडणे : तुये येथील सरकारी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिका विघ्नाली कुबल (२४, रा. वझरी-पेडणे) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी संशयित गौतम उदय देविदास या युवकाने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विघ्नाली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम उदय देविदास (रा. देऊळवाडा, कोरगाव) हा मंगळवारी सायंकाळी तुये येथील सरकारी आरोग्य केंद्रात आला होता. त्यावेळी कामावर असलेल्या परिचारिका विघ्नाली कुबल यांच्यावर त्याने अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या खाली कोसळल्यानंतरही संशयित गौतमने त्यांच्यावर वार करणे सुरूच ठेवले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी तातडीने धाव घेऊन संशयित गौतमला पकडून ठेवले. त्यानंतर त्याला पेडणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी संशयित गौतम उदय देविदास याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पेडणे परिसरात एकच खळबळ उडाली असून सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरापर्यंत संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.
तपासानंतरच हल्ल्यामागील कारण होणार स्पष्ट
विघ्नेश कुबल यांनी आपली बहीण विघ्नाली हिच्यावर गौतम उदय देविदास (रा. देऊळवाडा, कोरगाव) या युवकाने खुनी हल्ला केल्याची तक्रार पेडणे पोलिसात नोंद केली आहे. हा हल्ला प्रेमसंबंधातून झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी व्यक्त केला आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होईल, असेही निरीक्षक हळर्णकर यांनी स्पष्ट केले.