विधानसभेचा आखाडा : वास्को

काँग्रेसच्या नंदादीप राऊतांकडून जोरदार तयारी
विरोधकांचे बळ एकवटल्यास भाजपचा मार्ग खडतर
कार्लुस आल्मेदा, जुझे फिलिप डिसोझांकडे लक्ष
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : वास्को मतदारसंघाची निर्मिती १९८९ साली झाल्यावर या मतदारसंघातून भाजपाचे कार्लुस आल्मेदा वगळता इतर कोणीही सलगपणे दुसऱ्यांदा विजयी झालेले नाही. सायमन डिसोझा हे सलगपणे दोनवेळा विजयी झाले होते, तथापी ते वेगवेगळ्या मतदारसंघांतून विजयी झाले होते. वास्को मतदारसंघाची १९८९ साली निर्मिती झाल्यावर सायमन डिसोझा हे वास्को मतदारसंघातून, तर १९८४ साली दाबोळी मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यामुळे विद्यमान आमदार कृष्णा (दाजी) साळकर हे २०२७ निवडणुकीत विजय मिळवून सलगपणे दोनवेळा विजयी होण्याचा कार्लुस आल्मेदा यांची बरोबरी करणार का, हा प्रश्न विचारला जात आहे. या घडीला तरी आमदार साळकर यांच्यासमोर काँग्रसेचे नेते व माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत वगळता इतर कोणाचेही आव्हान नाही.
या मतदारसंघातून जुझे फिलिप डिसोझा हे दोन वेळा विजयी झाले होते. १९९९ मध्ये डिसोझा युगोडेपाच्या तिकिटावर, तर २००७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी मैदान मारले होते. दोन्ही वेळा त्यांची लढत भाजपचे तत्कालीन उमेदवार राजेंद्र आर्लेकर यांच्याशी झाली होती. २०२२ मध्ये जुझे फिलिप डिसोझा यांनी वास्को मतदारसंघाऐवजी दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तथापि त्यांची छाप पडली नाही. २०२७ च्या निवडणुकीत ते वास्को मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाने इतर राजकीय पक्षांशी युती केल्यास जुझे फिलिप डिसोझा वास्को मतदारसंघावर आपला दावा सांगतील, असे बोलले जात आहे.
दाजी साळकर
दाजी साळकर हे सातत्याने आपल्या मतदारांशी संपर्क साधून आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी विकासकामे हाती घेतली आहेत. आपली कामे अदृश्य नव्हे तर प्रत्यक्षात लोकांना दिसत असल्याचा दावा ते नेहमी करतात. गेल्या ३०-४० वर्षांत जो विकास झाला नाही, तो आपण केल्याचा दावा साळकर करतात. या दाव्याला त्यांच्या समर्थकांचे मोठे पाठबळ मिळत आहे. नंदादीप राऊत यांनी नगराध्यक्ष काळात येथील मासळी मार्केट व मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणासाठी लागणारा निधी जीसुडाच्या खात्यात वळता केला होता. अर्थात त्यावेळी त्यांना तत्कालीन आमदार आल्मेदा यांची साथ होती. गेल्या निवडणुकीत राऊत यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐनवेळी उमेदवारी आल्मेदा यांना देण्यात आल्यावर राऊत पुन्हा भाजपच्या बाजूने झाले होते. त्यानंतर काही घडामोडीनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. यावेळेस आपणास काँग्रेसची उमेदवारी मिळणारच, असे ते सांगतात. त्यांनी मतदारांशी संवाद, संपर्क साधण्यास आरंभ केला आहे. एखाद्या समस्यांवर, घटनांवर ते आवाज उठविताना, आमदार साळकर, भाजप सरकार यांना लक्ष्य करत आहेत.
या मतदारसंघातून १९८९ साली काँग्रेसचे सायमन डिसोझा यांनी मगोचे डॉ. विल्फेड मिस्किता यांचा ३२५ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोझा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. १९९४ च्या निवडणुकीत डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी पराभवाची परतफेड करताना काँग्रेसचे सायमन डिसोझा यांचा दीड हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोझा यांनी साडेचार हजारांहून अधिक मते मिळविली होती. १९९९ च्या निवडणुकीत युगोडेपाचे जुझे फिलिप डिसोझा सुमारे दीड हजार मतांनी भाजपचे राजेंद्र आर्लेकर यांच्यावर मात करून विजयी झाले होते. या निवडणुकीत मगोऐवजी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणारे डॉ. विल्फ्रेड मिस्किता, डॉ. श्रीकांत वेरेकर, अपक्ष उमेदवार व माजी आमदार सायमन डिसोझा रिंगणात होते. २००२ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेद्र आर्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी आमदार जुझे फिलिप डिसोझा यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचे करोल ताहीर दाऊद, मगोचे डॉ. श्रीकांत वेरेकर, अपक्ष उमेदवार तारा केरकर, सीपीएमचे थालमन परेरा रिंगणात होते. २००७ सालच्या निवडणुकीत जुझे फिलिप डिसोझा यांनी भाजपचे राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव केला. या निवडणुकीत जेडी(एस)तर्फे कार्लुस आल्मेदा, युगोडेपातर्फे आर्नाल्डो रेगो, मगोतर्फे सेर्व्हुलो बार्रोस, सेव गोवा फ्रंटतर्फे मिल्टन बार्रेटो उमेदवार होते.
जुझे फिलिप डिसोझा
२०१२ च्या निवडणुकीत भाजपचे कार्लुस आल्मेदा यांनी माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या व सुमारे साडेचार हजार मतांनी विजय मिळविला होता. यावेळेस माजी आमदार कार्ल वाझ यांनी मुरगावऐवजी वास्को मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांना फक्त १,३९४ मतांवर समाधान मानावे लागले. २०१७ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कृष्णा साळकर यांनी भाजपचे कार्लुस आल्मेदा यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. तथापि ते आव्हान मोडून आल्मेदा सलग दुसऱ्यांदा निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जुझे फिलिप डिसोझा, काँग्रेसचे सैफुल्ला खान, ‘आप’च्या लॉरेटा डिसोझा, मगोचे मनेश आरोलकर, उभे होते. २०२२मध्ये कार्लुस आल्मेदा यांना भाजपने तिकीट नाकारून कृष्णा साळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आल्मेदा यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली. ऐनवेळी उमेदवारी दाखल करून त्यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले होते. तथापि साळकर यांनी बाजी मारली.
एक मात्र खरे साळकर व त्यांच्या समर्थकांनी वास्को कदंब बसस्थानकावरून मोठा आवाज केला होता. आपण आमदार झाल्यास कदंब बसस्थानक पूर्णत्वाला नेण्याचे आश्वासन साळकर यांनी दिले होते. तथापि कदंब बसस्थानकाच्या रस्त्याचे डांबरीकरण वगळता बसस्थानक जैसे थे आहे. याउलट आता तेथे पीपीपी धर्तीवर बसस्थानक बांधताना पंचतारांकित हॉटल बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी नंदादीप राऊत यांनी आवाज उठविला आहे. या पीपीपी मॉडेलसंबंधी वास्कोवासीयांना योग्य स्पष्टीकरण देण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत यांनी आपले संपर्क कार्यालय सुरू करून मतदारांशी संवाद, संपर्क साधण्यास आरंभ केला आहे. सध्या तरी काँग्रेसतर्फे राऊत यांचे नाव घेतले जात आहे. या नावांमध्ये आणखी कोणाची भर पडते हे लवकरच स्पष्ट होईल.
नंदादीप राऊत
वास्को मतदारसंघात काँग्रसची एकगठ्ठा मते
वास्को मतदारसंघामध्ये काँग्रसची एकगठ्ठा मते आहेत. काँग्रेसने आमदार साळकर यांच्या तोडीस तोड उमेदवार दिल्यास, तसेच काँग्रेसची युती झाल्यास वास्को मतदारसंघात अटीतटीची लढत पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी आपण वास्को मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची हवा तयार केली होती. तथापि दीपक नाईक हे आता साळकर यांच्यासमवेत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.
कार्लुस आल्मेदा
कार्लुस आल्मेदांच्या प्रवेशाने भाजप मजबूत
माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी अलिकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काही नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. आता साळकर बिनधास्त आहेत. साळकर यांच्यासमोर कोणाचेही आव्हान नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. साळकर यांनी विकासकामे करून वास्कोचा कायापालट केला आहे. त्यामुळे वास्कोतील मतदार हे साळकर यांच्यामागे उभे राहतील यात शंकाच नसल्याचे त्यांचे समर्थक म्हणतात.