Home >> गुन्हे >> बाणावलीत धिरयोच्या आयोजनप्रकरणी कोलवा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

बाणावलीत धिरयोच्या आयोजनप्रकरणी कोलवा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

झुंजीत हरल्यानंतर पळताना समुद्रात गेलेल्या बैलाचा बुडून मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 mins ago
बाणावलीत धिरयोच्या आयोजनप्रकरणी कोलवा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

मडगाव : बाणावली समुद्रकिनार्‍यानजीक आयोजित एका बैलांच्या झुंजीत पराभूत बैल जीव वाचवण्यासाठी खवळलेल्या समुद्रात शिरला व त्याचा जीव गेला. या घटनेनंतर कोलवा पोलिसांनी संशयित आंतानिओ फर्नांडिस व सलीम यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बाणावली परिसरात जिल्हा प्रशासनाच्या धिरयो बंदीच्या आदेशानंतरही बेकायदेशीर धिरयो सुरू आहेत. बाणावली किनारी भागात बैलांच्या झुंजींचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीदरम्यान एका बैलाने माघार घेतली. प्रतिस्पर्धी बैल पुन्हा हल्ला करेल या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक बैल चौफेर धावू लागला. हा बिथरलेला बैल किनार्‍यावरून थेट समुद्राच्या उसळणार्‍या लाटांमध्ये धावला. समुद्र खवळलेला असल्याने आणि लाटांचा वेग जास्त असल्याने बैलाला पोहता आले नाही. तो खोल पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी बैलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांना यश आले नाही. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कोलवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
बाणावली येथील धिरयो आयोजनाप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित कोलवा येथील आंतानियो फर्नांडिस व संशयित सलीम (रा. सुरावली) याच्याविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजू वांतामुरी पुढील तपास करत आहेत.‍‍

न्यायालयाच्या आदेशाला हरताळ
राज्यात उच्च न्यायालयाकडून धिरयोवर (बैलांच्या झुंजींवर) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या बेकायदेशीर झुंजी रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची नेमणूकही केली आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेला धाब्यावर बसवून अद्यापही विविध भागांत अशा झुंजी छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे प्राणिप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा