बाणावलीतील घटना : बेकायदेशीर झुंजींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

मडगाव : बाणावली समुद्रकिनाऱ्यानजीक आयोजित करण्यात आलेल्या एका बेकायदेशीर बैलांच्या झुंजीत (धिरयो) दुर्घटना घडली. या झुंजीत पराभूत झालेला एक बैल जीव वाचवण्यासाठी पळत सुटला आणि थेट खवळलेल्या समुद्रात शिरला, जिथे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बंदी असलेल्या बेकायदेशीर बैलांच्या झुंजींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणावली परिसरात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून एका बेकायदेशीर धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. झुंजीदरम्यान एका बैलाने माघार घेतली. प्रतिस्पर्धी बैलाच्या भीतीने आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो बिथरलेला बैल किनाऱ्यावरून थेट समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये धावला. समुद्र खवळलेला असल्याने आणि लाटांचा वेग जास्त असल्याने बैलाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो खोल पाण्यात बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी बैलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता.
या दुर्घटनेमुळे गोव्यातील प्राणीमित्रांकडून आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मूक प्राण्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा बेकायदेशीर आयोजकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
व्हिडिओ व्हायरल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह
या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यानंतर स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गोव्यात बैलांच्या झुंजींवर उच्च न्यायालयाकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही, दक्षिण गोव्यातील विविध किनारी व ग्रामीण भागांत अशा झुंजी छुपेपणाने आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये लाखो रुपयांचा सट्टा लावला जातो.