Home >> गुन्हे >> मोरजीतील उमाकांत खोत खूनप्रकरणी तिन्ही संशयित पुराव्यांअभावी आरोपमुक्त

मोरजीतील उमाकांत खोत खूनप्रकरणी तिन्ही संशयित पुराव्यांअभावी आरोपमुक्त

मुख्य सूत्रधार अद्याप फरार : खोत यांचा जमिनीच्या सपाटीकरणाला होता विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th July, 11:56 pm
मोरजीतील उमाकांत खोत खूनप्रकरणी तिन्ही संशयित पुराव्यांअभावी आरोपमुक्त

पणजी : मोरजी येथील उमाकांत खोत (६३) यांच्या खून प्रकरणात प्रथमदर्शनी साक्षीदार नाही. तसेच अटक केलेल्या तिघा संशयिताविरोधात सबळ पुरावे नाही. असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित विजी सुप्पन, लोकेश पुत्तास्वामी व रोहित कुमार प्रजापती या तिघांना आरोपातून मुक्त केले. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अशोक कुमार नेदुरूमल्ली हा अद्याप फरार आहे. याबाबतचा आदेश न्या. शिल्पा पंडित यांनी दिला.
याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अर्जुन गावडे यांनी तक्रार दाखल केली. त्यात त्याने आपल्या मामा उमाकांत खोत (६३) यांचा खून केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास जमिनीच्या वादातून सदर घटना घडली होती. वरचावाडा-मोरजी येथील सर्वे क्रमांक १४९/१ च्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने डोंगर कापणी करून सुरू असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणाला विरोध केल्याने खोत यांचा खून झाला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी मांद्रे पोलिसांनी विजी सुप्पन, लोकेश पुत्तास्वामी व रोहित कुमार प्रजापती या तिघांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासपूर्ण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान तिघा संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. त्यावेळी न्यायालयाने तिघा संशयितांना सशर्त जामिनावर सुटका केली.

न्यायालयाने नोंदवलेली मुख्य निरीक्षणे
- या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, या प्रकरणात संपूर्ण गुन्ह्याचा कोणताही थेट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही.
- संशयितांचा या खुनाशी थेट संबंध जोडता येईल, अशी कोणतीही ठोस आणि दोषारोप सिद्ध करणारी सामग्री रेकॉर्डवर आलेली नाही.
- संशयित अर्जदारांच्या कपड्यांवर मानवी रक्ताचे डाग असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले असले, तरी ते रक्त मृत उमाकांत खोत यांच्याच रक्तगटाशी जुळणारे होते, हे सिद्ध करणारा कोणताही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक अहवाल पोलीस सादर करू शकले नाहीत.

हेही वाचा
सर्व पहा