‘एनडीपीएस’ कायद्याचे पालन न केल्याचा ठपका

पणजी : अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे संशयाचा फायदा देत मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयाने ज्ञानेश्वर सूर्यकांत कांदोळकर याची निर्दोष मुक्तता केली. हा आदेश न्या. विजया आंब्रे यांनी दिला.
गोवा पोलिसाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) या प्रकरणी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. हणजूण पंचायतजवळ असलेल्या एका दुकानाजवळ एक व्यक्ती ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्यानुसार, निवृत्त अधीक्षक वामन तारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सूरज हळर्णकर नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दितेंद्र नाईक व इतर पथकाने २० नोव्हेंबर २०१३ रोजी वरील ठिकाणी छापा टाकून ज्ञानेश्वर कांदोळकर याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ०.०८ ग्रॅम एलएसडी पेपर्स आणि २.८ ग्रॅम कोकेन जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. दरम्यान, एएनसीने तपासपूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान संशयितांतर्फे अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० अंतर्गत आवश्यक प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचा युक्तिवाद केला. संशयिताला न्यायदंडाधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यासमोर झडती घेण्याचा अधिकार स्पष्टपणे सांगितला गेला नाही, त्याच्या नकाराची लेखी नोंद ठेवली गेली नाही, तसेच जप्ती अहवालातील विसंगती आणि आरोपीचे कपडे जप्त न केल्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
न्यायालयाचे निरीक्षण
या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्वतंत्र पंच साक्षीदार तत्कालीन अधीक्षक कार्तीक कश्यप याची प्रभावी उलटतपासणी झाली नसल्याचे तसेच पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात त्रुटी राहिल्याचे नमूद केले. या त्रुटींमुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने ज्ञानेश्वर कांदोळकर याची निर्दोष मुक्तता केली.