Home >> ताज्या बातम्या >> कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच रजा द्या!

कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच रजा द्या!

प्रगत टप्प्यातील कर्करोगासाठीच सरकारी कर्मचाऱ्यांना सवलत; निदान होताच रजा लागू करण्याची शिक्षक संघटनांची मागणी


2 hours ago
कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच रजा द्या!

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : प्रगत टप्प्यातील (अॅडव्हान्स स्टेज) कर्करोग तसेच इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त शिक्षकांना सरकारकडून एक वर्षाच्या विशेष वैद्यकीय रजेची सवलत दिली जाते. मात्र या सवलतीचा लाभ अत्यंत मोजक्या शिक्षकांनाच मिळत असल्याने कर्करोगाचे निदान होताच रजा मंजूर करण्याची मागणी अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.
सरकारने १० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार गोवा, दमण आणि दीव शालेय शिक्षण कायदा, १९८४ अंतर्गत प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रगत टप्प्यातील कर्करोग, मूत्रपिंड व हृदयविकारासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ३६५ दिवसांची विशेष वैद्यकीय रजा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या रजेसाठी संबंधित शिक्षकाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) रुग्णालयाचे प्रमाणपत्र जोडून मुख्याध्यापकांमार्फत अर्ज करावा लागतो. त्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करून रजेला मंजुरी दिली जाते. गरज भासल्यास ही रजा एक वर्षापेक्षा अधिकही वाढवता येते.
शिक्षकांचे म्हणणे आहे की, कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तातडीने उपचार सुरू करावे लागतात. केमोथेरपी सुरू झाल्यानंतर रुग्णाला विश्रांतीची आवश्यकता असते. वेळेत उपचार सुरू झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. मात्र सध्याच्या नियमांनुसार केवळ प्रगत टप्प्यातील कर्करोग असलेल्या शिक्षकांनाच रजा मिळते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालेल्या अनेक शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. कर्करोगाचे निदान होताच विशेष रजेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या शिक्षकांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, असे त्यांचे मत आहे.

प्रगत टप्प्यातील कर्करोग आणि इतर दुर्धर आजारांसाठी शिक्षकांना वर्षभराची विशेष रजा देणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्करोगाचे निदान होताच रजा देण्याबाबतचा निर्णय घेणे हे सरकारच्या हातात आहे.
_ शैलेश झिंगडे, संचालक, शिक्षण

कर्करोगाचे निदान होताच शिक्षकांना विशेष रजेची तरतूद केली, तरच या सवलतीचा खऱ्या अर्थाने लाभ मिळेल. कर्करोग व इतर दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाही पुरेशी विशेष रजा मिळावी, यासाठी सरकारी सेवा नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.
_ अभय मांद्रेकर, अध्यक्ष, अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटना