Home >> गुन्हे >> संशयित गौतम देविदासला सात दिवसांची पोलीस कोठडी

संशयित गौतम देविदासला सात दिवसांची पोलीस कोठडी

तुये येथील नर्सवरील खुनी हल्ला : नर्सच्या जबाबानंतर हल्ल्याचे गूढ उलगडणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
संशयित गौतम देविदासला सात दिवसांची पोलीस कोठडी

पेडणे : तुये येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्स विघ्नाली विजय कुबल यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौतम देविदास (वय २५) याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू तसेच संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास सुरू असून, जखमी नर्स विघ्नाली कुबल यांचा जबाब तपासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विघ्नाली कुबल यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्या जबाब देण्यास सक्षम झाल्यानंतर हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कामावरून घरी जाताना केला हल्ला
घटनेच्या दिवशी विघ्नाली कुबल या रुग्णालयातील काम आटोपून जुन्या सामुदायिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना संशयिताने त्यांच्यावर पाळत ठेवून अचानक चाकूने सपासप वार केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि त्यांची सुटका केली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत संशयिताला पकडून पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पेडणे पोलीस निरीक्षक हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. जखमी नर्सचा अधिकृत जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतील आणि हल्ल्यामागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मैत्रीचा प्रयत्न फसल्याने हल्ल्याचा संशय
प्राथमिक तपासानुसार, बेरोजगार असलेल्या गौतम देविदासने विघ्नाली कुबल यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने संतापातून त्याने हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही त्याने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, त्यासंदर्भात गेल्या महिन्यातही पेडणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती.

हेही वाचा
सर्व पहा