वाहतुकीला अडथळा : अग्निशामक दलाची दमछाक

पैंगीण/ वाळपई : सत्तरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर तसेच वीजवाहिन्यांवर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. मात्र, वाळपई अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून वाहतूक पूर्ववत केली. या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
खडकी येथील श्रीराम मंदिराजवळ आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अग्निशामक कर्मचारी दत्ताराम आर. देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत झाड हटविले. या मोहिमेत अशोक व्ही. नाईक आणि उमेश गावकर यांनी सहभाग घेतला. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. ब्रह्मकरमळी बसथांब्याजवळ वाळलेले झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर पाडेली बसथांब्याजवळ फणसाचे झाड रस्त्यासह वीजवाहिन्यांवर कोसळले. वाळपई अग्निशामक दलाने तत्काळ झाड हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सत्तरीतील रावण कॉलनी परिसरातील श्री सातेरी मंदिराजवळ गुलमोहराचे झाड रस्ता आणि वीजवाहिन्यांवर कोसळले. वरिष्ठ अग्निशामक कर्मचारी पी. एस. गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
वाळपई नगरपालिका उद्यान परिसरात गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडण्याच्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. अग्निशामक जवान रामा नाईक यांनी वेळेत कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळली.
संध्याकाळी केरी येथील पुलाजवळ काजूचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वाळपई अग्निशामक दलाचे जवान ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झाड हटवून मार्ग मोकळा केला. याशिवाय वाळपई अग्निशामक केंद्रासमोरील वन प्रशिक्षण केंद्राच्या आवारात झाड कोसळल्याची तसेच तार-सावर्डे येथे आकेशिया झाड रस्ता आणि वीजवाहिन्यांवर पडल्याची घटनाही घडली. या दोन्ही ठिकाणीही अग्निशामक दलाने तत्काळ मदतकार्य केले.
आणखी झाडे कोसळण्याचा धोका
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण आठ झाडे रस्ते व वीजवाहिन्यांवर कोसळली असून सर्व झाडे यशस्वीपणे हटविण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यात आली. सततचा पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे सत्तरी तालुक्यात आणखी झाडे कोसळण्याचा धोका कायम आहे.
पाळोळे येथे झोपडीवर माड कोसळला
काणकोण येथील अग्निशमन दलाला विविध भागांतून आपत्कालीन मदतीसाठी अनेक कॉल प्राप्त झाले. चापोली येथे कार्यालय असूनही अग्निशमन दलाने सर्व घटनांवर तातडीने धाव घेत प्रभावी कार्यवाही केली.
पाळोळे येथील सायमन रिबेलो यांच्या झोपडीवर माड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून सुमारे १.५० लाख रुपयांची मालमत्ता वाचवली. अग्निशमन अधिकारी तुळसी देसाई यांनी चार जवानांसह घटनास्थळी पोहोचून कोसळलेला माड हटवला. यानंतर देवबाग येथील नारायण गावकर यांच्या गोठ्यावर पडलेली मोठी फांदीही हटविण्यात आली. तसेच नगर्से येथे एका घरावर कोसळलेले झाड काढून परिसर सुरक्षित करण्यात आला.
अग्निशमन जवान चंद्रहास पागी आणि प्रशांत वेळीप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हत्तीपावल, आंबेघाट, पाळोळे, शिशेगाळ, श्रीस्थळ, गोटकाममोळ आदी भागांतील अंतर्गत रस्त्यांवर कोसळलेल्या अनेक झाडांची पाहणी करून ती हटविण्याची कार्यवाही केली. याशिवाय देवबाग येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.