
मडगाव : बाणावली समुद्रकिनार्यानजीक आयोजित एका बेकायदेशीर बैलांच्या झुंजीत पराभूत बैल जीव वाचवण्यासाठी खवळलेल्या समुद्रात शिरला व त्याचा जीव गेला. या घटनेनंतर कोलवा पोलिसांनी संशयित आंतानिओ फर्नांडिस व सलीम यांच्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.
बाणावली परिसरात जिल्हा प्रशासनाच्या धिरयो बंदीच्या आदेशानंतरही बेकायदेशीर धिरयो सुरु आहेत. बाणावली किनारी भागात बैलांच्या झुंजींचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीदरम्यान एका बैलाने माघार घेतली. प्रतिस्पर्धी बैलाने पुन्हा हल्ला केला असता त्या बैलाने भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चौफेर धावू लागला. हा बिथरलेला बैल किनार्यावरून थेट समुद्राच्या उसळणार्या लाटांमध्ये धावला. समुद्र खवळलेला असल्याने आणि लाटांचा वेग जास्त असल्याने बैलाला पोहता आले नाही. तो खोल पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी बैलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांना यश आले नाही. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कोलवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
राज्यात धीरयोवर उच्च न्यायालयाकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हास्तरीय समित्यांची नेमणूक करून धिरयो न होण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर विविध भागांत धिरयो सुरू असल्याचे दिसते.
बाणावली येथील धिरयो आयोजनप्रकरणी कोलवा पोलिसांनी (Colva Police) संशयित कोलवा येथील आंतानियो फर्नांडिस व संशयित सलीम (रा. सुरावली) यांच्याविरोधात प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केलेला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजू व्ही. पुढील तपास करत आहेत.