जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार होणार

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly election Goa) उत्तर गोव्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनची (ईव्हीएम) प्राथमिक पातळीवरील तपासणी यावर्षाच्या ३ ते १४ ऑगस्ट पर्यंत होणार. निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार होणार.
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा झाली,अशी माहिती जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी दिली. या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरूदास देसाई, प्रवीण हिरे परब, उपजिल्हाधिकारी सफल शेट्ये आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिने, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, निवडणुकीचे साहित्य, पोस्टल बॅलट, वाहतूक व्यवस्था, स्ट्रॉंग रूम, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण याविषयी चर्चा झाली. जबाबदारीचे वाटप तसेच आवश्यक ती कामे पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली.
संबंधीत खात्यांकडे बैठक घेऊन समन्वय साधण्याविषयी आवश्यक त्या सूचना जारी करण्यात आल्या. सर्वात प्रथम उत्तर गोव्यातील मतदारसंघांसाठी ज्या ईव्हीएमचा वापर होणार त्याची तपासणी (फस्ट लेवल चेकींग) करण्याचा निर्णय झाला.