
पणजी : गोव्यातील पर्यावरण वाचवण्यासाठी ना विकास क्षेत्र (एनडीझेड) (NDZ) असणे आवश्यक आहे. याद्वारे नदी, डोंगर, शेती, समुद्र किनाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. मात्र बाणावलीचे आमदार एनडीझेडला विरोध करत आहेत. विरोध करून आदरांना त्यांच्या दिल्ली लॉबीच्या जमिनी वाचवायच्या आहेत का आहे का याचे उत्तर देणे आवश्यक आहे. त्यांनी एनडीझेडबाबत लोकांची दिशाभूल करू नये; अशी प्रतिक्रिया मिकी पाशेको यांनी दिली.
बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाशेको म्हणाले की, एकीकडे ३९ अ मुळे राज्यातील जमिनींचे रुपांतरण सुरू आहे. यामुळे येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. याला राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. त्यामुळे नगरनियोजन कायद्यातून सरकारने हे कलम रद्द केले पाहिजे.
दुसऱ्या बाजूला एनडीझेड घोषित करणे ही चांगली गोष्ट आहे. यामुळे गोव्यातील जमिनी वाचत असतील तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे. लोकांनी, पंचायतींनी आपल्या भागातील संवेदनशील जागा एनडीझेड मध्ये घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. बाणावलीच्या आमदारांनी एनडीझेडला नेमका विरोध कशासाठी हे स्पष्ट करावे.
ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने (Congress Party) एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे आम्ही तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. गिरीश चोडणकर यांच्यावर माझा विश्वास नाही. ते प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसने तिकीट दिले तरी ते मी घेणार नाही.
राज्यात धीरयो (Dhiryo) हा एक पारंपारिक खेळ आहे. त्याला कायदेशीर करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने परदेशी देणगी कायद्यात बदल केले आहेत. यामुळे अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे. याबाबत मी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले आहे.