Home >> गोवा >> सहकाऱ्याचा खून; दोघांना जन्मठेप

सहकाऱ्याचा खून; दोघांना जन्मठेप

राय येथे २०२० साली करण्यात आला होता खून

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
7 hours ago
सहकाऱ्याचा खून; दोघांना जन्मठेप

मडगाव : दमन, राय येथे २०२० मध्ये सहकारी एडिसन सोरंग (२१ वर्षे)  याच्यावर फावड्याने हल्ला करत खून करणार्‍या दोघांना मडगावातील दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने (South Goa District and Session Court)  जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  प्रदीप डुंगडुंग व आनंद साशा (दोघेही मूळ रा. झारखंड)  अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी हा निकाल दिला. प्रदीप डुंगडुंग (वय २६ वर्षे) आणि आनंद साशा (वय २३, दोघेही मूळचे झारखंड) यांनी त्यांचा सहकारी एडिसन सोरंग या तरुणाची हत्या केली होती. 

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार; ही घटना ३० ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली होती. मृत एडिसन आणि दोन्ही आरोपी मजूर म्हणून काम करत होते. आणि एकाच खोलीत वास्तव्यास होते. घटनेच्या रात्री एडिसनच्या मैत्रिणीच्या फोन नंबरवरून आरोपी आनंद साशा याने एडिसनला चिडवण्यास सुरूवात केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यादरम्यान झालेल्या झटापटीत स्वतःचा बचाव करण्यासाठी मृत एडिसनने आरोपी प्रदीपच्या छातीवर आणि हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला.  त्यामुळे रागाने लालबुंद झालेला आरोपी आनंद साशा याने एडिसनच्या डोक्यावर फावड्याने वार केले. यात एडिसनच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला आधी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात व नंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेण्यात आले. उपचार सुरू असताना ३१ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

न्यायालयातील सुनावणीच्या वेळी एकूण २३ साक्षीदार तपासले. यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर यांचा समावेश होता.  घटनास्थळावरून जप्त केलेले रक्तबंबाळ कपडे व हत्येसाठी वापरलेले फावडे  न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आरोपींना बचावासाठी कोणताही पुरावा सादर करता आला नाही. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोघांनाही खून केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

 आरोपी प्रदीप डुंगडुंग हा ३१ ऑगस्टपासून २०२० पासून कोठडीत असून त्याचा ५ वर्षे, १० महिने आणि ८ दिवसांचा काळ, तर आरोपी आनंद साशा हा १ सप्टेंबर २०२० पासून कोठडीत असून त्याचा ५ वर्षे, १० महिने आणि ७ दिवसांचा कोठडीतील आतापर्यंतचा काळ त्यांच्या अंतिम शिक्षेतून वजा केला जाईल. 

हेही वाचा
सर्व पहा