
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये कोणत्याही नव्या पक्षाचा समावेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीए मध्ये येणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. आणि पूर्णविराम दिला.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "आमचे दरवाजे नव्या पक्षांसाठी खुले नाहीत. आम्ही सध्या एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुतीतील विद्यमान घटक पक्षांसोबतच काम करत आहोत."
भाजपकडून शरद पवार गटाशी संपर्क साधला जात असल्याच्या चर्चांना त्यांच्या या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) (Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दिल्लीत भेट झाल्याच्या वृत्तांनंतर या चर्चांना उधाण आले होते.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी अशा सर्व चर्चांना निराधार ठरवत कोणत्याही नव्या पक्षाच्या प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली.