Home >> देश -परदेश >> आता बसगाड्या धावण्यासाठी होणार कचऱ्याची मदत : नितीन गडकरी

आता बसगाड्या धावण्यासाठी होणार कचऱ्याची मदत : नितीन गडकरी

कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर दिल्लीत धावतील बस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
आता बसगाड्या धावण्यासाठी होणार कचऱ्याची मदत : नितीन गडकरी

नवी दिल्ली : दिल्लीतील महापालिकेच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर भविष्यात बस धावतील, अशी महत्त्वाकांक्षी संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (‘Delhi buses will run on hydrogen produced from garbage’: Nitin Gadkari)  यांनी मांडली. दिल्ली भाजपच्या युवा अधिवेशनात बोलताना त्यांनी कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करून स्वच्छ इंधन निर्मितीवर भर दिला.

गडकरी म्हणाले की, शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केला जाईल. या प्रक्रियेतून हायड्रोजन तयार होईल आणि त्याचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी, विशेषतः दिल्लीतील बस चालविण्यासाठी केला जाऊ शकतो. "हे पूर्णपणे शक्य आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी पाण्यापासून हायड्रोजन तयार करून वाहने चालविण्याचे तंत्रज्ञानही विकसित होईल, असे सांगितले. या संकल्पनेबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांवर उत्तर देताना त्यांनी, "गेल्या ५० वर्षांत मी केलेल्या भाकितांपैकी कोणते खोटे ठरले आहे?" असा सवाल केला.

लँडफिलसाठी कचऱ्याचा द्रुतगती मार्गांसाठी वापर

दिल्लीतील लँडफिलमध्ये सुमारे ८० लाख टन कचऱ्याचा वापर द्रुतगती मार्गांच्या बांधकामासाठी करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. तसेच २०२७ पर्यंत देश कचरामुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांडपाणी विकून दरवर्षी ३२५ कोटी 

याशिवाय, त्यांच्या मतदारसंघातील महापालिका प्रक्रिया केलेले सांडपाणी विकून दरवर्षी सुमारे ३२५  कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत असल्याचे सांगत त्यांनी कचरा व्यवस्थापनातून आर्थिक लाभही मिळू शकतो, असे नमूद केले.

ई-२० पेट्रोलवरून टीकेला प्रत्युत्तर

ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलमुळे वाहनांना नुकसान होत असल्याच्या दाव्यांवरही गडकरी यांनी जोरदार प्रतिवाद केला. "ई-२० पेट्रोलमुळे एका तरी कारला अडचण आली असल्याचे उदाहरण द्या," असे आव्हान त्यांनी टीकाकारांना दिले.

भारत दरवर्षी इंधन आयातीवर सुमारे २२ लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून इथेनॉलसारख्या स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ई-२० पेट्रोलबाबत पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मक प्रचाराला त्यांनी "पैसे देऊन चालविलेले दिशाभूल करणारे अभियान" असे संबोधले.


हेही वाचा
सर्व पहा