बाबू कवळेकर यांची माहिती : कोकणी नाट्यस्पर्धेचे ‘अर्धशतक’

पणजी : गोवा कला अकादमीतर्फे आयोजित कोकणी नाट्यस्पर्धेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून, या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ कोकणी नाट्यलेखक पुंडलिक नाईक यांना शुक्रवारी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात कोकणी नाट्य क्षेत्रातील ३० पुरस्कारांचेही वितरण होणार असल्याची माहिती कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी दिली.
पणजी येथील कला अकादमीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कला अकादमीचे सहसचिव शंकर गावकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
कवळेकर म्हणाले की, गोवा कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच दशकांत कोकणी नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नाटककार पुंडलिक नाईक यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुरस्कारामध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
गोवा आकाराने लहान राज्य असले तरी कोकणी भाषेची आणि नाट्यपरंपरेची समृद्धी मोठी असल्याचे कवळेकर यांनी नमूद केले. गेल्या ५० वर्षांत गोव्यातील लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी दर्जेदार कोकणी नाटके सादर करून राष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटविला आहे. दिल्लीसारख्या मोठ्या व्यासपीठावरही कोकणी नाटकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बरयस्से पिंपळ पेटला’ नाटकाचे सादरीकरण
या कार्यक्रमात उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, अभिनय, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा आणि नेपथ्य आदी विविध विभागांतील पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. तसेच कोकणी नाट्यस्पर्धेच्या ५० वर्षांच्या प्रवासावर आधारित विशेष स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पुंडलिक नाईक लिखित ‘बरयस्से पिंपळ पेटला’ या कोकणी नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही कवळेकर यांनी दिली.