Home >> गोवा >> आगरवाडा सरकारी हायस्कूल परिसरात अस्वच्छता; मैदानाचीही दुरवस्था

आगरवाडा सरकारी हायस्कूल परिसरात अस्वच्छता; मैदानाचीही दुरवस्था

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : तातडीने स्वच्छता करण्याची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
आगरवाडा सरकारी हायस्कूल परिसरात अस्वच्छता; मैदानाचीही दुरवस्था

पेडणे : आगरवाडा येथील चोपडेकर सरकारी हायस्कूल परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, शाळेच्या मैदानाचीही दुरवस्था झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांत नाराजीचे वातावरण आहे. शाळेच्या परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवून मैदानाची दुरुस्ती तसेच अपूर्ण कुंपण पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शाळेच्या परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, आगरवाडा ग्रामपंचायतीकडून शाळेच्या इमारतीलगत कचरा साठविला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शाळेचे मैदानही पावसाळ्यात अक्षरशः तळ्याचे स्वरूप धारण करत आहे. मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना क्रीडा उपक्रम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मैदानाची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी पुढे येत आहे. याशिवाय शाळेच्या परिसराचे कुंपण अद्याप अपूर्ण असून, काही भाग मोकळा असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित भागातही कुंपण उभारून शाळेचा परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, शाळेच्या इमारतीची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली असली तरी त्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने बांधकामातील टाकाऊ साहित्य इमारतीच्या मागील बाजूस टाकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.

अस्वच्छ वातावरणात शिक्षणाचे धडे

शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने संबंधित खात्याने तातडीने पाहणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, मैदानाची दुरुस्ती करावी. कचऱ्याची विल्हेवाट लावावी तसेच अपूर्ण कुंपण पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा