Home >> गोवा >> ऐन पावसाळ्यात नळ कोरडे; शिरशिरे-बोरी ​परिसरात संताप

ऐन पावसाळ्यात नळ कोरडे; शिरशिरे-बोरी ​परिसरात संताप

ग्रामस्थांकडून सहाय्यक अभियंत्याची भेट : समस्या साेडविण्याचे आश्वासन

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
ऐन पावसाळ्यात नळ कोरडे; शिरशिरे-बोरी ​परिसरात संताप

फोंडा : शिरशिरे-बोरी भागातील पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. नळातून पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिकांनी गुरुवारी सकाळी सहाय्यक अभियंता काशिनाथ सराफ यांची भेट घेऊन चर्चा केली. बांधकाम खात्याने स्थानिक लोकांना सार्वजनिक नळ उपलब्ध करून दिल्याने बोरी पंचायत क्षेत्र २० वर्षामागे गेला असून पाण्याच्या प्रश्नावरून राजकीय नेते लोकांच्या जीवनाशी खेळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बोरी पंचायत क्षेत्रातील शिरशिरे येथे गेल्या काही महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बांधकाम खात्याने त्वरित नवीन पाण्याची वाहिनी घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक लोकांच्या सोयीसाठी एक सार्वजनिक नळ सुद्धा उपलब्ध करून दिला होता. परंतु, परिसरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्थानिक लोकांनी गुरुवारी सकाळी बांधकाम खात्याच्या कार्यालयात धडक दिली.

बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता काशिनाथ सराफ यांनी पाण्याचा दाब कमी होत असल्याने पाणी पुरवठावर परिणाम होत आहे. कर्मचारी सध्या वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या वाहिनीवर लक्ष देऊन आहेत. लोकांना सुरळीत पाणी पुरवठा करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय क्षेत्रातील लोक पाण्यावरून जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक लोकांना त्वरित नळातून पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सहाय्यक अभियंता काशिनाथ सराफ यांनी लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

शिरशिरे-बोरी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना त्रास सोसावा लागत आहे. नळातून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने बांधकाम खात्याने एक सार्वजनिक नळ उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बोरी पंचायत भाग २० वर्षे मागे गेल्याचे दिसून येत आहे. कारण २० वर्षांपूर्वी गावातील लोकांना सार्वजनिक नळाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते, असे प्रदीप बोरकर यांनी सांगितले. 


हेही वाचा
सर्व पहा