Home >> गोवा >> केवळ स्थानिक मच्छीमारांनाच मिळणार विक्रीची परवानगी : मुख्यमंत्री; लवकरच देणार कार्ड

केवळ स्थानिक मच्छीमारांनाच मिळणार विक्रीची परवानगी : मुख्यमंत्री; लवकरच देणार कार्ड

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 hours ago
केवळ स्थानिक मच्छीमारांनाच मिळणार विक्रीची परवानगी : मुख्यमंत्री; लवकरच देणार कार्ड

पणजी:  स्थानिक मच्छीमारांचे हित जपण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. लवकरच मत्स्योद्योग खात्यातर्फे राज्यातील पारंपरिक मच्छिमारांना, विक्रेत्यांना कार्ड दिले जाईल. केवळ असे कार्ड असणाऱ्यांनाच राज्यात मासे विक्री करता येईल;  अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केली. 

गुरुवारी पणजीत राष्ट्रीय मत्स्य शेती दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर, संचालिका शमिला माँतेरो, सचिव प्रसन्न आचार्य व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात मत्स्योद्योग वगळता अन्य सर्व व्यवसाय परराज्यातील व्यक्तींच्या हातात गेले आहेत. मत्स्योद्योग स्थानिकांच्या हाती राहणे आवश्यक आहे. यासाठीच स्थानिक मच्छीमारांना कार्ड देण्यात येणार आहे. गोव्यातील पंधरा वर्षे रहिवाशी आणि मत्स्योद्योगात असणाऱ्या व्यक्तींना असे कार्ड दिले जाईल. स्थानिक मच्छिमारांनी देखील मासेमारी व्यवसायात परराज्यातील लोकांना प्रवेश करून देऊ नये. मासे कापण्याचे, धुण्याचे काम देखील स्थानिकांना द्यावे. 

मुख्यमंत्री म्हणाले, मत्स्योद्योग आपल्याच हाती राहावा यासाठी स्थानिकांनी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्थानिक मच्छी विक्रेत्यांनी आपल्या जागा परराज्यातील व्यक्तीला चालवायला देऊ नयेत. अथवा आपल्या मच्छीमार कार्डावर अन्य कुणाला विक्रीची परवानगी देऊ नये. या व्यवसायात खूप पैसा आहे. हे समजल्यावर परराज्यातील व्यक्ती या व्यवसायात देखील शिरकाव करतील. आज मासे कापणारा परराज्यातील व्यक्ती काही दिवसांनी मासे विक्री देखील सुरू करेल. यासाठी स्थानिकांनी सजग राहिले पाहिजे. 

रस्त्याकडेला विक्री करणाऱ्यांवर कारवाई

मुख्यमंत्री म्हणाले की, माशांची विक्री केवळ ठरवून दिलेल्या जागेतच झाली पाहिजे. रस्त्याकडेला बसून मासे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गोमंतकीयांनी देखील केवळ बाजारातच मासे खरेदी करावेत. कार्ड नसताना मासे विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा