दुरुस्तीसाठी घेतला निर्णय

पणजीः पणजीतील कला अकादमीचे (KalaAcademy Goa) दिनानाथ मंगेशकर सभागृह १ ऑगस्टपासून दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. हे काम कधी पूर्ण होणार हे तज्ज्ञ सदस्यांनी सादर केलेल्या अंतिम अहवालावर अवलंबून आहे. यासाठी आयआयटी चेन्नईचे डॉ. पिल्लई यांची तज्ञ म्हणून नेमणूक केली आहे, अशी माहिती कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी दिली.
कला अकादमीच्या दुरुस्ती कामाविषयी कृती दलाने केलेल्या कामाचा तपशील सादर करताना गावकर यांनी सांगितले की, कृती दलाने आवाज, रोषणाई आणि ध्वनीशास्त्र आणि संरचनात्मक स्थिरता हे दोन वेगळे विषय घेऊन त्यांच्यासाठी वेगळे तज्ञ नेमले आहेत.
आवाज, रोषणाई आणि ध्वनीशास्त्रासाठी तीन तज्ञ कृती दलात नियुक्त केले आहेत. त्यांनी प्रथम मूळ अहवाल तयार केला होता. पण अंतिम अहवाल तयार करण्यासाठी त्यांनी मागे पाहणी केली आहे. आता या अंतिम अहवालात कुठल्या चुका सुधारायच्या हे सांगितल्यावर त्यानुसार त्रुटी सुधारणार असे गावकर यांनी सांगितले.
संरचनात्मक स्थिरता आणि त्रुटी सुधारण्याची पद्धत या विषयात कृती दलाने आयआयटी चेन्नई डॉ. पिल्लई यांची नियुक्ती केली आहे. प्रथम जे काम झाले आहे ते बरोबर आहे की नाही हे तज्ञच व्यवस्थित सांगू शकतात. काय चुकले आहे आणि काय सुधारायला हवे ते तज्ञ आपल्या अंतिम अहवालात मांडून सार्वजनिक बांधकाम खात्याला ही कामे प्राधान्यक्रमावर घेण्यास सांगणार. अंदाजीत खर्च तयार करून १ ऑगस्टपासून काम चालू करणार, अशी माहिती गावकर यांनी दिली.
कला अकादमीच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांचा अंदाजीत खर्च तयार केला होता. त्यातील १० कोटी रुपये रोखून धरले आहेत. आणि हे काम त्या १० कोटी रुपयांतून होणार. जोपर्यंत या विषयीचा अहवाल तयार होत नाही; तोपर्यंत हे पैसे मंजूर होणार नाहीत, असे गावकर यांनी स्पष्ट केले.
केवळ कला अकादमीचे दिनानाथ मंगेशकर सभागृह बंद असणार. पूर्ण कला अकादमी नाही. कृष्णकक्ष, इतर वर्ग आणि कार्यालये सुरू असणार. १ ऑगस्टनंतर बुकींग करण्यास मिळणार नाही. हे सभागृह किती दिवस बंद असणार असा प्रश्न कृती दलाला विचारला होता. त्यावर ते म्हणतात तज्ञ सदस्यांच्या अंतिम अहवालावर अवलंबून आहे. जर ते सर्व काही व्यवस्थित आहे, असे म्हणत असतील तर काहीच काम होणार नाही. लहान काही काम असल्यास महिन्याभरात होऊ शकते, अशी माहिती गावकर यांनी दिली.