Home >> ताज्या बातम्या >> केपेत काँग्रेसला कवळेकरांचे आव्हान

केपेत काँग्रेसला कवळेकरांचे आव्हान

विधानसभेचा आखाडा : केपे

Story: अजय लाड |
10th July, 11:34 pm
केपेत काँग्रेसला कवळेकरांचे आव्हान

 अंतर्गत वाद शमवण्याचे काँग्रेससमोर आव्हान    

 संघटनेच्या जोरावर विजयी होण्याची कवळेकरांना आशा

 मतदारसंघ एसटीसाठी राखीव झाल्यास बदलणार समीकरणे

गोवन वार्ता
मडगाव : राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या केपे मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. २०२२ मध्ये झालेला धक्कादायक पराभव पचवून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, विद्यमान काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी स्थानिक अस्मिता कायम राखत विकासकामांच्या मुद्द्यांना हात घातला आहे. याशिवाय एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्यास या मतदारसंघाचे राजकारण पूर्णपणे बदलले जाणार आहे.


एल्टन डिकॉस्टा
विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. सध्या त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि सरकारी कार्यालयांचे स्थलांतर यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. पराभवानंतरही मतदारसंघात सक्रिय राहून बाबू कवळेकरांनी पुन्हा एकदा जनसंपर्क वाढवला आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाकडूनही या निवडणुकीत उमेदवार दिला जाऊ शकतो.
कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली असून बाबू कवळेकर यांनी कुशावती जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे करण्याची मागणी लावून धरली आहे. हा मुद्दा त्यांच्या प्रचाराचा भाग असण्याची शक्यता आहे. केपेतील सरकारी कार्यालये कुडचडे येथे हलवण्याच्या हालचालींना आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही विरोध केला आहे. केपेकरांची गैरसोय खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांनीही या मुद्द्यावर जनमत संघटित केले आहे. केपेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना दिसत असला, तरी ही लढाई एल्टन डिकॉस्टा विरोधात बाबू कवळेकर अशी जास्त वैयक्तिक स्वरूपाची आहे. काँग्रेसने नुकतेच संघटनात्मक फेरबदल करत केपे गट समिती बरखास्त केली असून के. सी. वेणुगोपाल यांच्या गोवा दौर्‍यानंतर काँग्रेस पुन्हा एकत्रितपणे काम करेल, असा दावा केला जात आहे.
केपे मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसचा ‘हात’ धरणार की विकासाच्या नावावर ‘कमळ’ फुलवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, या निवडणुकीत जो उमेदवार स्थानिक आदिवासी समाज आणि ख्रिश्चन मतदारांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होईल, विजयाची माळ त्याच्याच गळ्यात पडणार आहे. या सर्व बाबतीत एसटी समाजाला राजकीय आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. राजकीय आरक्षण दिले गेल्यास केपे मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार आहे व सध्याची सर्व राजकीय गणिते बदलून जाणार आहेत. दरम्यान, एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्यास भाजपचे याआधीचे आमदार प्रकाश वेळीप यांना पुन्हा एकदा चांगली संधी मिळेल.


बाबू कवळेकर
२०१७ च्या निवडणुकीत केपे मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबू कवळेकर यांनी भाजपचे उमेदवार प्रकाश वेळीप यांचा पराभव केला होता. बाबू कवळेकर यांना १३,५२५ मते मिळाली, तर प्रकाश वेळीप यांना १०,९३३ मते मिळाली होती. ‘आप’चे उमेदवार जुवांव फर्नांडिस यांना १,३८५ मते मिळाली होती. प्रकाश वेळीप यांनी बाबू कवळेकरांना चांगली लढत दिली; पण प्रादेशिक पक्षाचा प्रभाव न राहिल्याने तसेच ख्रिश्चन आणि पारंपरिक काँग्रेस मतदार पूर्णपणे बाबू कवळेकरांच्या पाठीशी उभा राहिल्याने त्यांनी बाजी मारली.


प्रकाश वेळीप
२०२२ च्या निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये बाबू कवळेकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले. सत्ता पाठीशी असल्याने कवळेकर सहज जिंकतील असा कयास होता; परंतु केपेच्या मतदारांनी त्यांना धक्का दिला. काँग्रेसचे उमेदवार एल्टन डिकॉस्टा यांनी १४,९९४ मते मिळवली, तर बाबू कवळेकर यांना ११,३९३ मते मिळाली. ३,६०१ मतांनी एल्टन यांनी विजय मिळवला. आरजीचे विशाल गावस देसाई यांना १,१४४ मते, ‘आप’च्या राहुल परेरा यांना २६९ मते मिळाली. या निवडणुकीत बाबू यांच्यासह काँग्रेसची मतेही मिळतील, हा समज चुकीचा ठरला. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान ८३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले. भाजपची मतटक्केवारी ४१ टक्के, तर काँग्रेसने आपली मतटक्केवारी ५१ टक्क्यांवरून ५३.९ टक्क्यांपर्यंत वाढवली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला केपे जिंकण्यासाठी ३,६०० मतांची दरी भरून काढावी लागेल. काँग्रेसला अंतर्गत गटबाजी रोखून हक्काची मते टिकवून ठेवावी लागणार आहेत.
सलग चार वेळा विजयी कवळेकरांचा पक्षांतरानंतर पराभव
केपे मतदारसंघ हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसच्या विचारसरणीचा बालेकिल्ला राहिला आहे. ख्रिश्चन आणि अनुसूचित जमाती मतदारांची मोठी संख्या या मतदारसंघात निर्णायक ठरते. २००२ पासून २०१७ पर्यंत सलग चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले बाबू कवळेकर हे या मतदारसंघातील हुकुमाचा एक्का होते. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या दहा आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. २०२२ च्या निवडणुकीत केपेच्या जनतेने हे पक्षांतर नाकारले. राजकारणात नवख्या एल्टन डिकॉस्टा यांनी बाबू कवळेकरांचा ३,६०१ मतांनी पराभव केला. हा पराभव कवळेकरांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का देणारा ठरला.


योगेश कुंकळ्येकर
एसटींसाठी राखीव झाल्यास उमेदवारांचे गणित बिघडणार
केपे मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारासाठी राखीव होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येथील सर्वच उमेदवारांचे गणित बिघडणार आहे. बाबू कवळेकर आणि एल्टन डिकॉस्टा यांना रिंगणातून दूर राहावे लागेल. माजी आमदार प्रकाश वेळीप यांना ते फायद्याचे ठरेल. मतदारसंघ एसटींसाठी राखीव झाला नाही, तर अनेक दावेदार या मतदारसंघात तयारीला लागले आहेत. त्यात उद्योजक योगेश कुंकळ्येकर यांचेही नाव आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत ते आहेत. त्या दृष्टीने जनसंपर्कावर त्यांनीही भर दिला असून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.