Home >> ताज्या बातम्या >> कला-संस्कृतीमुळे समाज समृद्ध होतो : श्रीपाद नाईक

कला-संस्कृतीमुळे समाज समृद्ध होतो : श्रीपाद नाईक

कोकणी नाट्य स्पर्धेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा : पुंडलिक नाईक यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान


10th July, 11:51 pm
कला-संस्कृतीमुळे समाज समृद्ध होतो : श्रीपाद नाईक

ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक. सोबत मंत्री रमेश तवडकर, बाबू कवळेकर व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : कला आणि संस्कृतीमुळे समाज समृद्ध होतो. कोकणी नाट्य स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून कोकणी संस्कृती आणि नाट्यपरंपरेचा समृद्ध वारसा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
कला अकादमी आयोजित कोकणी नाट्य स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कोकणी नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक पुंडलिक नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी, सदस्य सचिव शंकर गावकर व इतर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी ‘समकालीन भारतीय रंगभूमीवरील कोकणी नाटक’ विषयावर परिसंवाद घेण्यात आला. पुंडलिक नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, मानपत्र, पुस्तक आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी त्यांच्या पत्नी हेमा नाईक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुंडलिक नाईक यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.
कोकणी माणूस विविध भागांत विखुरलेला असला, तरी त्याने कला, साहित्य आणि संस्कृती जपली आहे, असे कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी सांगितले. पूर्वी कोकणी नाट्य स्पर्धेत पाचही नाटके सादर होत नसत; मात्र आता सहभाग आणि दर्जा दोन्ही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी कोकणी नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच कोकणी रंगभूमीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिग्दर्शक, नाटककार, अभिनेते, संगीतकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार आणि नैपथ्यकार कलाकारांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी स्वागत केले. प्रदीप गावकर यांनी आभार मानले.
‘वैकुंठ नाईक हेच माझे गुरू’
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुंडलिक नाईक यांनी आपल्या लेखनप्रवासातील आठवणींना उजाळा दिला. मराठी प्राथमिक शाळेत शिकताना आपण घरात मराठी नाटकांतील संवाद मोठ्याने वाचत असू. शेजारी राहणारे वैकुंठ नाईक यांनी ते संवाद ऐकून त्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे संवाद लिहिण्याची प्रेरणा दिली आणि त्यातूनच आपण कोकणी लेखक झालो. वैकुंठ नाईक हेच माझे खरे गुरू आहेत, असे पुंडलिक नाईक यांनी भावूक होऊन सांगितले.
गोव्याची ओळख केवळ पर्यटनभूमी म्हणून नव्हे, तर संस्कृतीसमृद्ध भूमी म्हणून जपली पाहिजे. समाजातील सुमारे २० टक्के लोक सर्जनशील आणि संवेदनशील असतात. संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी याच घटकावर असते. ज्या व्यक्तीला, गावाला किंवा राज्याला संस्कृती नसते, त्याचा ऱ्हास अटळ असतो.
_ रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री