Home >> गोवा >> आतापर्यंत ८ शिक्षकांना ‘दुर्धर आजार रजा योजने’चा लाभ

आतापर्यंत ८ शिक्षकांना ‘दुर्धर आजार रजा योजने’चा लाभ

बाबाजी सावंत : शिक्षकांनी मानले सरकारचे आभार

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
20 mins ago
आतापर्यंत ८ शिक्षकांना ‘दुर्धर आजार रजा योजने’चा लाभ

पणजी : कॅन्सरसह इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांसाठी वर्षभराची विशेष वैद्यकीय रजा देण्याच्या योजनेचा लाभ आतापर्यंत ७ शिक्षकांना मिळाला असून, आणखी एका शिक्षकाच्या रजेची मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण ८ शिक्षकांना या योजनेचा दिलासा मिळाला असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून मिळाली आहे. ही योजना अत्यंत कल्याणकारी असून, यासाठी ऑल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटना सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत यांनी दिली.
कॅन्सर, किडनी विकार आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी शिक्षकांना वर्षभर (३६५ दिवस) विशेष वैद्यकीय रजा देण्याची सवलत सरकारने दिली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश १० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. गोवा, दमण आणि दीव शालेय शिक्षण कायदा १९८४ अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे. ‘अॅडव्हान्स स्टेज कॅन्सर’ किंवा इतर दुर्धर आजारांच्या उपचारासाठीच ही वर्षभराची रजा मंजूर केली जाते. प्राथमिक शिक्षकांपासून ते उच्च माध्यमिक विद्यालयांत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ही सवलत लागू आहे.
तालुकानिहाय लाभार्थी शिक्षक
शिक्षण खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रजा मंजूर झालेल्या आणि प्रक्रियेत असलेल्या ८ शिक्षकांमध्ये बार्देशमधील ४, तिसवाडीतील २, सासष्टीतील १ व काणकोणमधील १ अशा एकूण८ शिक्षकांचा समावेश आहे. ८ पैकी ७ शिक्षकांची रजा मंजूर झाली असून, उर्वरित एका शिक्षकाची रजा डॉक्टरांच्या शिफारसीनंतर तातडीने मंजूर केली जाईल. राज्यात सध्या अनेक शिक्षक विविध आजारांचा सामना करत असून कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारची ही योजना आजारी शिक्षकांसाठी अत्यंत आधार देणारी आणि पूरक ठरत आहे.

सध्या ही रजा केवळ ‘अॅडव्हान्स स्टेज’ मधील कॅन्सर रुग्णांनाच मिळते. वास्तविक पाहता, आजाराचे निदान होताच ही रजा मिळायला हवी. तरीही, गंभीर आजारी शिक्षकांसाठी अशी वर्षभराची रजा देणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. ही योजना अत्यंत फायदेशीर असून कॅन्सरचे निदान होताच रजा मिळावी, अशी एक दुरुस्ती या योजनेत आवश्यक आहे.
-बाबाजी सावंत, अध्यक्ष, अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटना

हेही वाचा
सर्व पहा