आगशी पोलिसांनी घेतले ताब्यात; ‘रेंट अ कॅब’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पणजी : गोवा वेल्हा येथे ‘रेंट अ कॅब’ आणि स्प्लेंडर मोटरसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जनार्दन हरमलकर (वय ४९, रा. धारगळ, पेडणे) यांचा मृत्यू झाला. ही कार चालवणारा चालक अल्पवयीन असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या हातात कार कशी दिली, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी हरमलकर यांच्या मृतदेहावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आगशी पोलिसांनी वास्को येथील एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी रात्री ११:३० वाजता हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, कॅब आणि स्प्लेंडर मोटरसायकल ही दोन्ही वाहने पणजीहून मडगावच्या दिशेने जात होती. गोवावेल्हा येथील 'बॅनेटॉन' शोरूमजवळ कॅबने पुढे जाणाऱ्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर ही कॅब रस्त्याशेजारील विजेच्या खांबाला धडकली. यात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात मोटरसायकल आणि कॅबचे मोठे नुकसान झाले आहे.
गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच
गोव्यात ‘रेंट अ कॅब’ आणि ‘थार’ गाड्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाड्याने दिली जाणारी वाहने आणि त्यामुळे होणारे अपघात हा विषय गंभीर बनला आहे. असे असतानाही एका अल्पवयीन मुलाच्या ताब्यात ‘रेंट अ कॅब’ कशी देण्यात आली, यावरून संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी आगशी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झाकीर हुसेन पुढील तपास करत आहेत.