विशांत नाईक गावणेकर नवे प्रशासक

मडगाव : गोवा सरकारच्या कायदा आणि न्याय विभागाने मडगाव येथील प्रसिद्ध मठग्रामस्थ हिंदू सभा सोसायटीच्या कारभारासाठी नवीन प्रशासकाची नियुक्ती केली आहे. गोवा नागरी सेवेतील अधिकारी विशांत एस. नाईक गावणेकर (संयुक्त सचिव, प्रशासकीय सुधारणा विभाग) यांची सोसायटीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांच्या जागेवर ही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. मठग्रामस्थ हिंदू सभा सोसायटीच्या अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आणि वादविवादांचा अद्याप अंतिम निकाल न लागल्याने, सरकारने प्रशासकीय राजवटीचा कालावधी आणखी ६ महिन्यांसाठी वाढवला आहे. हा नवा आदेश १६ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
सोसायटी नोंदणी गोवा दुरुस्ती कायदा, २०२३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपालांच्या आदेशानुसार कायदा विभागाचे अवर सचिव (आस्थापना) गजानन भोसले यांनी हा आदेश जारी केला आहे.