Home >> गोवा >> कारापूर-सर्वणवासीय करणार दिल्लीत आंदोलन

कारापूर-सर्वणवासीय करणार दिल्लीत आंदोलन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
56 mins ago
कारापूर-सर्वणवासीय करणार दिल्लीत आंदोलन

पणजी : कारापूर-सर्वण येथे येऊ घातलेल्या भव्य बांधकाम प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिक प्रदीर्घ काळ आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला लवकरच शंभर दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, काही स्थानिक आंदोलक १३ जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे धरणे धरणार आहेत. दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याच दिवशी (१३ जुलै) पणजीतील आझाद मैदानावरही समांतर आंदोलन केले जाईल, अशी माहिती ‘इनफ इज इनफ’चे स्वप्नील शेर्लेकर यांनी दिली. शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोविंद शिरोडकर आणि देविदास आमोणकर उपस्थित होते.

शेर्लेकर यांनी सांगितले की, ‘इनफ इज इनफ’ या संघटनेतर्फे कारापूर-सर्वणवासियांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. स्थानिकांचा प्रखर विरोध असतानाही या गावात मोठा बांधकाम प्रकल्प रेटून नेला जात आहे. या प्रकल्पात अनेक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असूनही सरकार त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाची मोठी हानी होणार नाही, तर भविष्यात येथील लोकसंख्येचे गणितही पूर्णपणे बिघडणार आहे. आताच जर या प्रकल्पाला विरोध केला नाही, तर बिल्डर लॉबीला चुकीचा संदेश जाईल. स्थानिकांचा कितीही विरोध असला, तरी गोव्यात आपण वाटेल ते प्रकल्प राबवू शकतो, असा त्यांचा समज दृढ होईल.

ते पुढे म्हणाले की, सरकारसाठी हा प्रकल्प म्हणजे जणू 'लिटमस टेस्ट'च आहे. गोमंतकीय कोणत्या थराला जाऊन आंदोलन करू शकतात, याची सरकारला चाचपणी करायची आहे. सरकार आणि बिल्डर लॉबीने स्थानिकांना गृहीत धरू नये, यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे. १३ जुलै रोजी सर्वांनाच दिल्लीला जाणे शक्य नसल्याने, आम्ही आझाद मैदान येथे समांतर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला योग्य तो संदेश देणे गरजेचे आहे.

हेही वाचा
सर्व पहा