Home >> गुन्हे >> पंढरपुरात गर्दीत महिला वारकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपुरात गर्दीत महिला वारकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत स्पष्ट कैद;महिला चोरांना भाविकांनी पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
45 mins ago
पंढरपुरात गर्दीत महिला वारकऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पंढरपूर: विठ्ठल मंदिर परिसरातील एका बांगड्यांच्या दुकानात महिला भाविकांची गर्दी असताना, महिला चोरांच्या एका टोळीने एका वारकरी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागरूक महिला भाविकांनी प्रसंगावधान राखत या चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पंढरपूर यात्रेच्या काळात देशभरातून लाखो भाविक विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी येतात. या काळात मुख्य मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि बाजारपेठेत कमालीची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन महिला वारकऱ्यांचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि सोन्याच्या साखळ्या चोरण्याचे सत्र एका टोळीने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. बांगड्यांच्या दुकानात घडलेली ही ताजी घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. ही टोळी अतिशय नियोजित पद्धतीने गर्दीत घुसून महिलांना लक्ष्य करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न होताच, पीडित महिलेला आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या इतर महिला भाविकांना याचा सुगावा लागला. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ संशयित महिलांना घेराव घातला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या महिलांना पकडल्यानंतर, उपस्थितांनी कायदा हातात न घेता आधी त्या चोरट्यांना जाब विचारला. या अनपेक्षित प्रतिकारामुळे चोरट्यांचे धाबे दणाणले. यानंतर भाविकांनी या संशयित महिलांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा
सर्व पहा