मिरामार पणजी येथे आयोजित टाऊन हॉल सभेत बोलताना अरविंद केजरीवाल. समोर उपस्थित जनसमुदाय.
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : ई-२० इंधनामुळे गोव्यातील ८७ टक्के जनता त्रस्त आहे. हे इंधन रद्द करायचे असेल तर आगामी गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हाच एकमेव पर्याय आहे. १० मार्च रोजी निकाल लागून भाजपचा पराभव झाल्यास १५ मार्च रोजी ई-२० इंधन रद्द केले जाईल. तसे झाले नाही तर आपण राजकारण सोडू, अशी घोषणा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली.
मिरामार येथे आयोजित ई-२० टाऊन हॉल सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी ई-२० इंधनामुळे येणाऱ्या समस्या मांडल्या. केजरीवाल म्हणाले की, ई-२० इंधनाबाबत त्यांनी वाहन दुरुस्त करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी ई-२० इंधनामुळे वाहनांचे मायलेज ३० ते ४० टक्क्यांनी कमी होणे तसेच इंजिनमध्ये बिघाड होणे, या प्रमुख समस्या असल्याचे सांगितले.
वाहन उत्पादक कंपन्यांची ‘सियाम’ नावाची संघटना आहे. या संघटनेने आपल्या बैठकीत एका अहवालात ई-२० इंधन धोकादायक असल्याचे नमूद करून त्याला विरोध केला होता. केंद्र सरकारने हा अहवाल सार्वजनिक करू नये, असा सल्लाही दिला होता. मात्र, हा अहवाल सोशल मीडियावर लीक झाला. त्यानंतर अहवाल मागे घेण्यासाठी कंपन्यांवर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचा दबाव आणण्यात आला. पुढे हा अहवाल हटवून कंपन्यांनी आपली चूक झाल्याचे सांगितले, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
१ एप्रिल २०२६ पासून गोव्यातही ई-२० इंधनाचा वापर
गोव्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठी असल्याने ई-२० इंधनाचा सर्वाधिक परिणाम गोव्यावर झाला आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गोव्यातील ४७ टक्के घरांमध्ये कार असून, ८७ टक्के लोकांकडे दुचाकी आहे. मात्र, गोव्यात अद्याप ई-२० लागू झाले नसल्याचे सरकार सांगत आहे. त्यामुळे गोव्यात सामान्य पेट्रोल उपलब्ध आहे, या संभ्रमात गोमंतकीयांनी राहू नये. १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण गोव्यात ई-२० लागू झाले आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला.


