Home >> गुन्हे >> पोलिसांनी​ रात्रीच्या गस्तीवेळी हटकल्याने सापडला पंजाबमधील सराईत गुन्हेगार

पोलिसांनी​ रात्रीच्या गस्तीवेळी हटकल्याने सापडला पंजाबमधील सराईत गुन्हेगार

मांद्रे पोलिसांची कारवाई : खुनासह शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th July, 11:46 pm
पोलिसांनी​ रात्रीच्या गस्तीवेळी हटकल्याने सापडला पंजाबमधील सराईत गुन्हेगार

पेडणे : आश्वे येथील भूमिका मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पंजाबमधील एका २४ वर्षीय युवकाला मांद्रे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीवेळी ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याविरुद्ध पंजाबमधील अमृतसर येथे खुनासह शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. संबंधित युवकाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५ अंतर्गत अटक करण्यात आली असून, त्याचा ताबा घेण्यासाठी पंजाब पोलिसांचे विशेष पथक गोव्याकडे रवाना झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नियमित गस्तीदरम्यान भूमिका मंदिर परिसरात एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने दिलेली माहिती विसंगत व समाधानकारक नसल्याने त्याला पुढील चौकशीसाठी मांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या कारवाईची माहिती अमृतसर पोलिसांना देण्यात आली असून, आरोपीचा ताबा घेण्यासाठी पंजाब पोलिसांचे विशेष पथक गोव्याकडे रवाना झाले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संशयिताला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मांद्रे पोलिसांनी दिली. सतर्क गस्तीमुळे गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अमृतसरमध्ये गंभीर गुन्हे दाखल
सखोल चौकशीत त्याने आपले नाव दिलजीत उर्फ राहुल कुलदीप सिंग (२४), रा. अमृतसर, पंजाब असे सांगितले. पडताळणीत अमृतसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३, १०९, १९०, १९१ तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत खुनासह गंभीर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा
सर्व पहा