कोलवा पोलिसात गुन्हा नोंद, सीसीटीव्ही फुटेजमुळे हिंसेचा प्रकार समोर

मडगाव : सासष्टी तालुक्यातील बेताळभाटी परिसरातील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याच पोटच्या मुलाने आणि सुनेने घरात अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. पीडित वृद्धाच्या लंडनमध्ये राहणार्या मुलीच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी पीडिताच्या मुलासह सूनेवर गुन्हा नोंद केला.
बेताळभाटी राणेवाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिक लोयोला डिसोझा यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. लंडनमध्ये राहणार्या पीडित वृद्धाच्या मुलीने कोलवा पोलिसांना ई-मेलद्वारे पाठवलेली तक्रार आणि घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज समोर आल्यानंतर कोलवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित वृद्धाचा मुलगा इझिदोर सुझा आणि सून तेरेसा गोन्साल्विस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार मुलगी मारिया डिसोझा हिने लंडन येथून कोलवा पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ८ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बेटालभाटी येथील घरात त्यांचे ८५ वर्षीय वडील लोयोला डिसोझा यांना त्यांचा भाऊ इझिदोर आणि भावजय तेरेसा यांनी मारहाण केली. वयोवृद्ध वडील असहाय्य असल्याने ते बचाव करू शकले नाहीत. या मारहाणीमुळे त्यांना मानसिक धक्का बसला असून ते भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
लंडनमध्ये राहणार्या मारिया यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. या व्हिडिओ फुटेजमध्ये मुलगा व सून वृद्ध वडिलांना चपलाने व हाताने मारहाण करत असल्याचे दिसते. तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. तसेच संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कोलवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.