Home >> गोवा >> गोव्याच्या काजूला जर्मनीत सर्वाधिक मागणी

गोव्याच्या काजूला जर्मनीत सर्वाधिक मागणी

एकूण निर्यातीत एकट्या जर्मनीचा वाटा ५१ टक्के

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
12th July, 11:01 pm
गोव्याच्या काजूला जर्मनीत सर्वाधिक मागणी

पणजी : गोव्याच्या काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, जर्मनी हा देश गोव्याच्या काजूचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून समोर आला आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२५-२६ मध्ये गोव्यातून परदेशात २१४.३३ मेट्रिक टन काजूची निर्यात करण्यात आली. या निर्यातीमधून २.१२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १८.५३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
‘एपीडा’च्या आकडेवारीनुसार, एकट्या जर्मनीने ९.४४ कोटी रुपये मूल्याच्या १०८.२२ मेट्रिक टन काजूची आयात केली आहे. गोव्याच्या एकूण काजू निर्यातीमध्ये जर्मनीचा वाटा तब्बल ५१ टक्के असून, जर्मनी या वर्षातील गोव्याच्या काजूचा सर्वात मोठा आयातदार ठरला आहे.

युरोपीय बाजारपेठेत गोव्याच्या काजूचा दबदबा
या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान असून, जपानने ४.३१ कोटी रुपये मूल्याचा ४७.६३ मेट्रिक टन काजू आयात केला आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सने २.६४ कोटी रुपयांचा ३१.७५ मेट्रिक टन, तर युनायटेड किंगडमने (युके) २.१४ कोटी रुपये मूल्याच्या २६.७३ मेट्रिक टन काजूची खरेदी केली आहे.
ही आकडेवारी दर्शवते की, गोव्याच्या काजू निर्यात बाजारपेठेवर युरोपीय देशांचा पूर्णपणे दबदबा आहे. जर्मनी आणि नेदरलँड्स या दोन्ही युरोपीय देशांनी मिळून एकूण १२.०८ कोटी रुपयांचा काजू आयात केला असून, राज्याच्या एकूण काजू निर्यात मूल्यात या दोन्ही देशांचा वाटा जवळपास ६५ टक्के आहे. एकूण निर्यात महसुलापैकी निम्म्याहून अधिक महसूल एकट्या जर्मनीतून मिळत असतानाच, जपान हा जवळपास २५ टक्के (एक चतुर्थांश) वाट्यासह एक मुख्य आशियाई बाजारपेठ म्हणून उभा राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही मागणी स्थिर
काजू हे गोव्याच्या पारंपरिक शेतकी उत्पादनांमधील एक प्रमुख उत्पादन असून, राज्याच्या ॲग्रो-प्रोसेसिंग (कृषी प्रक्रिया) क्षेत्रात याचा फार मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हिएतनाम आणि भारताच्या इतर मोठ्या उत्पादक राज्यांकडून तगडे आव्हान व मोठी स्पर्धा असतानाही, गोव्याच्या काजूची मागणी आणि त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा