विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव : ‘फोंडा फर्स्ट’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

फोंडा : राज्यात भाजप सरकार सर्वच क्षेत्रांत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. स्वतःला ‘डबल इंजिन सरकार’ म्हणवून घेणाऱ्या या सरकारच्या इंजिनला आता भ्रष्टाचाराचा मोठा गंज चढला आहे. या सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे २७ आमदार निवडून येतील आणि राज्यात परिवर्तन होईल, असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.
‘फोंडा फर्स्ट’ या संस्थेतर्फे आयोजित दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फोंडा येथील या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह ॲड. ईशान उसपकर, ‘फोंडा फर्स्ट’चे अध्यक्ष राजेश वेरेकर आणि सचिव कल्पेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकाचा अपेक्षाभंग केला असून खोटी आश्वासने देऊन जनतेची निव्वळ दिशाभूल चालवली आहे, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थी दशेत उच्च शिक्षण घेताना शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाचे व आज्ञेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात यश प्राप्तीसाठी कठोर मेहनत करताना कधीही अपयशाला खचून जाऊ नका, तर जिद्दीने पुढे जा.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोंडा परिसरातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘फोंडा फर्स्ट’चे अध्यक्ष राजेश वेरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिव कल्पेश पारकर यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले.
सकारात्मक विचाराने ध्येयाकडे वाटचाल करा: ॲड. उसपकर
यावेळी ॲड. ईशान उसपकर यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाने शिक्षण घेताना आपले लक्ष एकाग्र ठेवणे गरजेचे आहे. नजरेसमोर निश्चित ध्येय ठेवून कार्य केल्यास यश नक्कीच मिळते. यशाचे शिखर गाठण्यासाठी निरंतर प्रयत्न हवेत. त्याचबरोबर जीवनात सकारात्मक विचाराने कार्य करताना नकारात्मक विचार नेहमी बाजूला ठेवावेत, असे ते म्हणाले.