पोलिसांकडून संशयिताला अटक : पायधुनी परिसरात तणाव

मुंबई : मुंबईतील पायधुनी (Pydhonie Mumbai ) परिसरात एका इमारतीमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर सुरक्षारक्षकाने (swcurity gaurd) लैंगिक अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद स्थानिक पातळीवर उमटले असून, संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्यावर धडक देत जोरदार निदर्शने केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनाही जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली असून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी इमारतीमधील वॉशरुममध्ये गेली असता, तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने आत घुसून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयित आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. दरम्यान, स्थानिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि पोलिसांकडून माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी आणि संतप्त नागरिकांनी नार्वेकर यांच्या गाडीला वेढा घातला. आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा गोंधळ घातला.
पोलीस ठाण्याबाहेर रास्तारोको; वाहतूक ठप्प
घटनेचे वृत्त परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन घोषणा दिल्या. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून 'रास्तारोको' आंदोलन केले, ज्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधून आणि त्यांची समजूत काढून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केला.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
सध्या पायधुनी आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईसारख्या महानगरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून अशा गुन्ह्यांविरोधात जलदगतीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.