सोलापुरात ३७ हजार लिटर भेसळयुक्त दुधावर कारवाई होताच साताऱ्यात कमालीची भीती; ७२ तासांत ९० लाखांचा साठा जप्त.

सातारा : प्रशासकीय शिस्तीचा कडक बडगा आणि धडक कारवाईचा धसका घेतला की काय होऊ शकते, याचा एक अतिशय धक्कादायक प्रकार साताऱ्यातील माण तालुक्यात समोर आला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सुरू केलेल्या धडक मोहिमेचा धाक आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे.
माण तालुक्यातील मोही गावात 'अन्न व औषध प्रशासनाचे पथक आले' अशी केवळ एक अफवा पसरली आणि दूध संकलन चालकांची पुरती पळापळ झाली. कारवाईच्या आणि मोठ्या दंडाच्या भीतीने घाबरलेल्या चालकांनी कायदेशीर चौकशीला सामोरे जाण्याऐवजी, संकलित केलेले शेकडो लिटर दूध थेट रस्त्याच्या कडेला आणि गटारात ओतून दिले.
रोजच्या प्रमाणे शेतकऱ्यांकडून गोळा केलेले पांढरे शुभ्र दूध जेव्हा रस्त्यावरून वाहू लागले, तेव्हा स्थानिक ग्रामस्थही अवाक् झाले. जर दूध शुद्ध आणि दर्जेदार होते, तर मग केवळ तपासणीच्या भीतीने ते ओतून देण्याची गरज का पडली, हा खरा मोठा प्रश्न आहे. या दुधात मोठ्या प्रमाणावर भेसळ तर नव्हती ना, या संशयाने आता तालुक्यात जोर धरला असून या केंद्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दुसरीकडे, या भीतीमागे एफडीएकडून राज्यभरात सुरू असलेली मोठी कारवाई कारणीभूत आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जवळा येथे एफडीएने नुकतीच मोठी कारवाई करून, तब्बल १५ लाख रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूधसाठा जागेवरच नष्ट केला आहे. केवळ दूधच नव्हे, तर अवघ्या ७२ तासांत मुंबई, पुणे, सोलापूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध शहरांमध्ये धाडी टाकून प्रशासनाने तब्बल ९०.४२ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या अवैध ब्युटी क्रीम्सपासून ते विनापरवाना चालणाऱ्या आयुर्वेदिक औषध कारखान्यांपर्यंत अनेकांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अगदी हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्सकडून होणारी रुग्णांची पिळवणूकही या मोहिमेत चव्हाट्यावर आली आहे.