१६ वर्षीय अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.

पणजी : गोव्यात सध्या 'रेंट अ कॅब' आणि पर्यटकांच्या बेदरकार वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच गोवा वेल्हा येथे गुरुवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात धारगळ-पेडणे येथील ४९ वर्षीय दुचाकीस्वार जनार्दन हरमलकर यांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातास कारणीभूत ठरलेली ही कार चालवणारी व्यक्ती कोणी प्रौढ नसून वास्को येथील अवघा १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा असल्याचे तपासात उघड झाले.
माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल ही दोन्ही वाहने पणजीहून मडगावच्या दिशेने जात होती. गोवा वेल्हा येथील एका शोरूमजवळ भरधाव कॅबने पुढे जाणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वाराला काही अंतरापर्यंत रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले आणि त्यानंतर ही कॅब रस्त्याशेजारील विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जनार्दन हरमलकर यांना तात्काळ बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची गंभीर दखल घेत आगशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर (ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड) हजर केले आहे. या गुन्ह्यात केवळ त्या मुलालाच नाही, तर अल्पवयीन आणि परवाना नसलेल्या मुलाच्या हातात गाडी सोपवल्याबद्दल संबंधित वाहन मालकाविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोव्यात रेंट अ कार आणि थार गाड्यांच्या वाढत्या अपघातांमुळे आधीच स्थानिक जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत असून आगशी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.