Home >> गुन्हे >> ३५ वर्षे कायद्याला वाकुल्या दाखवणाऱ्या 'मिस्टर नटवरलाल'चा अखेर गेम ओव्हर!

३५ वर्षे कायद्याला वाकुल्या दाखवणाऱ्या 'मिस्टर नटवरलाल'चा अखेर गेम ओव्हर!

साडे तीन दशकांत ३०० हून अधिक पंचतारांकित हॉटेल्सना लावला चुना; काय आहे याची स्टोरी ? वाचा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
३५ वर्षे कायद्याला वाकुल्या दाखवणाऱ्या 'मिस्टर नटवरलाल'चा अखेर गेम ओव्हर!

नेटफ्लिक्सवरील क्राईम थ्रिलर सीरिज पाहिली असेल किंवा चार्ल्स शोभराजचे कारनामे तुम्ही ऐकलेच असतील. रूप बदलण्यात पटाईत, पोलिसांना चकमा देण्यात हुशार आणि अतिशय धूर्त! अगदी याच चार्ल्स शोभराजचा कित्ता गिरवत गेल्या ३६ वर्षांपासून पोलिसांच्या नाकावर टिच्चून आलिशान हॉटेल्सना लुटणाऱ्या एका हायप्रोफाईल ठकसेनाचा खेळ अखेर संपला आहे. रायपूर पोलिसांनी गुरुवारी या 'नटवरलाल'ला चोराला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या अटकेनंतर समोर आलेले कारनामे ऐकून भल्याभल्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.

तामिळनाडूच्या या 'हाय-क्लास' चोराचे नाव आहे विंगसन जॉन! जॉनने कोणाचा खून केला नसला, तरी केवळ आपल्या बुद्धीच्या आणि क्लासी स्टाईलच्या जोरावर देशातील बड्या हॉटेल्सना लीलया चुना लावण्यात त्याचा हातखंडा होता.

३०० हून अधिक पंचतारांकित हॉटेल्सना लावला चुना

विंगसन जॉन हा कोणी साधासुधा चोर नाही. त्याने देशातील तब्बल ३०० हून अधिक आलिशान ५-स्टार हॉटेल्सना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. जॉनने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातील हॉटेल्सनाही आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दृष्टीने कसून तपास सुरू आहे.

फाडफाड इंग्रजी अन् उच्चभ्रू राहणीमान!

जॉनची गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) एकदम युनिक आणि कॉर्पोरेट दर्जाची होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश करताना त्याचा रुबाब पाहण्यासारखा असायचा. त्याचे इंग्रजी भाषेवरील उत्कृष्ट प्रभुत्व, बोलण्याची स्टाईल आणि व्हीआयपी राहणीमान पाहून हॉटेलचे कर्मचारी पुरते प्रभावित व्हायचे. कधी तो परदेशी टूर गाईड बनायचा, तर कधी इंग्रजीचा प्रोफेसर किंवा योग प्रशिक्षक असल्याचे भासवायचा. त्याच्या याच भारदास्त लूकमुळे मोठे हॉटेल्सही त्याच्याकडे 'ॲडव्हान्स' पैसे मागण्याची हिंमत करत नसत.

फ्री ऐषोआराम आणि महागड्या वस्तूंची चोरी

एकदा का हॉटेलमध्ये विनाअडचण एन्ट्री मिळाली, की जॉन तिथल्या महागड्या सेवासुविधांचा मोफत आस्वाद घ्यायचा. काही दिवस तिथे राजासारखा ऐषोआराम केल्यानंतर, बिल भरण्याची वेळ येण्यापूर्वीच तो गुपचूप गायब व्हायचा. जॉन केवळ बिल बुडवून थांबायचा नाही, तर जाता जाता हॉटेलमधील महागडे लॅपटॉप, गॅजेट्स आणि इतर मौल्यवान वस्तूंवरही डल्ला मारायचा.

रायपूरमधील 'त्या' एका चुकीमुळे सापडला पोलिसांच्या तावडीत!

गेली ३६ वर्षे हा खेळ राजरोसपणे सुरू होता. पण रायपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेली चोरी जॉनला महागात पडली. तिथे दोन दिवस राहून जॉनने ६३,७५५ रुपयांचे बिल तर बुडवलेच, शिवाय हॉटेल प्रशासनाचा १ लाख ४८ हजार रुपयांचा महागडा लॅपटॉप घेऊन तो पसार झाला.

हॉटेलच्या तक्रारीनंतर रायपूर पोलिसांनी हे प्रकरण सायबर युनिटकडे सोपवले. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे जॉनचा माग काढत थेट भुवनेश्वर गाठले आणि या 'इंटरनॅशनल' ठकसेनाच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा
सर्व पहा