Home >> देश -परदेश >> बलात्काराच्या आरोपीकडून ६ जणांची निर्घृण हत्या

बलात्काराच्या आरोपीकडून ६ जणांची निर्घृण हत्या

पत्नी, मुलांसह पीडितेच्या कुटुंबालाही संपवले

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
14 hours ago
बलात्काराच्या आरोपीकडून ६ जणांची निर्घृण हत्या

रंगारेड्डी (तेलंगणा): तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला राजकुमार नावाचा आरोपी जामिनावर बाहेर येताच त्याने अवघ्या काही तासांत ६ जणांची निर्घृण हत्या केली. यामध्ये त्याची स्वतःची पत्नी, दोन लहान मुले आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन पीडितेसह तिच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार शुक्रवारी रात्री जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो थेट त्याच्या घरी पोहोचला. तिथे त्याने कौटुंबिक वादातून व रागाच्या भरात आपली ३० वर्षीय पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि अवघ्या १८ महिन्यांच्या निष्पाप मुलाची गळा दाबून किंवा धारदार शस्त्राने हत्या केली.
स्वतःच्या कुटुंबाचा थरारक अंत केल्यानंतर राजकुमारचा राग शांत झाला नव्हता. तो तिथून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावात पायी चालत गेला. हे गाव त्या १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेचे होते, जिने १६ मे रोजी राजकुमारविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराची तक्रार नोंदवली होती. याच तक्रारीमुळे राजकुमारला तुरुंगात जावे लागले होते.
राजकुमारने पीडितेच्या घरात घुसून त्या १७ वर्षीय मुलीची, तिच्या आईची आणि आजीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. एकाच रात्री अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी ६ खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
फरार आरोपीचा शोध सुरू
या भीषण हत्याकांडानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवले आहेत. जामिनावर सुटलेल्या आरोपीने इतके मोठे पाऊल कशामुळे उचलले आणि त्याला या गुन्ह्यात कोणाची मदत मिळाली का, याचा तपास पोलीस करत आहेत. फरार राजकुमारचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा
सर्व पहा