मडगाव पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव : इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून, प्रेमसंबंधांचे नाटक करत एका अज्ञात भामट्याने नावेली येथील एका महिलेला तब्बल ३ लाख ३८ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत घडला. अज्ञात संशयिताने तक्रारदार महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती स्वीकारल्यानंतर आरोपीने चॅटिंगद्वारे तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर दोघांनी मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली.
काही दिवसांतच संशयिताने स्वतःला पैशांची तीव्र गरज असल्याचे सांगत खोटे कारण पुढे केले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिलेने वेळोवेळी विविध बँक खात्यांवर आणि युपीआय आयडीवर एकूण ३ लाख ३८ हजार रुपये ट्रान्सफर केले. पैसे उकळल्यानंतरही आरोपीने महिलेची भेट घेणे टाळले आणि घेतलेली रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मडगाव पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अनुष्का परब करत आहेत.