Home >> ताज्या बातम्या >> ताळगावात पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्री राजकारणाचाच वरचष्मा

ताळगावात पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्री राजकारणाचाच वरचष्मा

मोन्सेरात कुटुंबाच्या गढात नव्या चेहऱ्याची चर्चा : विरोधी पक्षांच्या युतीवर भाजपचे भवितव्य अवलंबून

Story: गणेश जवाडेकर। गोवन वार्ता |
11th July, 09:48 pm
ताळगावात पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्री राजकारणाचाच वरचष्मा

पणजी शहरालगत असलेला ताळगाव विधानसभा मतदारसंघ हा गोव्यातील राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिला आहे. या मतदारसंघावर एखाद्या पक्षापेक्षा व्यक्तीचे वर्चस्व अधिक राहिले आहे. गोव्यात असे काही मतदारसंघ आहेत, जे पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्री राजकारणासाठी ओळखले जातात. संबंधित नेता कोणत्याही पक्षात गेला तरी त्या मतदारसंघातून विजयी होतो. ताळगाव मतदारसंघ त्याचेच एक प्रमुख उदाहरण मानला जातो.

गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर १९८९ मध्ये ताळगाव मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वी शेती, पडिक जमीन आणि पारंपरिक घरांसाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ आता दुकाने, सुपरमार्केट, आधुनिक निवासी संकुले आणि उंच इमारतींमुळे पूर्णपणे शहरी स्वरूपाचा झाला आहे.

मोन्सेरात कुटुंबाचे वर्चस्व

२००२ पासून या मतदारसंघावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे वर्चस्व राहिले आहे. बाबूश आणि जेनिफर मोन्सेरात यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारीवर विजय मिळविल्याने ताळगावमध्ये मोन्सेरात कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या उदयापूर्वी या मतदारसंघात माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचा प्रभाव होता, मात्र २००२ च्या निवडणुकीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली.

मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे यावेळी जेनिफर मोन्सेरात निवडणूक लढवण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मागील विधानसभा अधिवेशनातही त्या अनुपस्थित होत्या. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा रोहित मोन्सेरात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षांची आघाडी न झाल्यास भाजपला फायदा

भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी व्हावी, अशी मागणी आता विविध विरोधी पक्षांकडून होत आहे. विरोधी पक्षांची युती झाल्यास ताळगावमध्ये भाजपसमोर खरे आव्हान उभे राहू शकते. मात्र, युती न झाल्यास मतविभाजनाचा सर्वाधिक फायदा भाजपच्या उमेदवारालाच होईल, अशी राजकीय समीकरणे आहेत.

निवडणुकीची आकडेवारी आणि इतिहास

वर्ष विजेता उमेदवार पक्ष
१९८९सोमनाथ जुवारकरकाँग्रेस
१९९४सोमनाथ जुवारकरकाँग्रेस
१९९९सोमनाथ जुवारकरकाँग्रेस
२००२बाबूश मोन्सेरातयूजीडीपी
२००५ (पोटनिवडणूक)बाबूश मोन्सेरातकाँग्रेस
२००७बाबूश मोन्सेरातयूजीडीपी
२०१२जेनिफर मोन्सेरातकाँग्रेस
२०१७जेनिफर मोन्सेरातकाँग्रेस
२०२२जेनिफर मोन्सेरातभाजप
२०२२ विधानसभा निवडणुकीचा निकाल

• जेनिफर मोन्सेरात (भाजप) : १०,१६७ मते
• टोनी रॉड्रिग्ज (काँग्रेस) : ८,१२६ मते
• सेसिल रॉड्रिग्ज (आप) : २,६०७ मते
• जोसेफ रोंकॉन (आरजी) : १,६५१ मते
• पुंडलिक रायकर (अपक्ष) : २८९ मते

ताळगाव मतदारसंघावर मोन्सेरात कुटुंबाची पकड

ताळगाव मतदारसंघावर मोन्सेरात कुटुंबाची पकड आजही मजबूत मानली जाते. मात्र, त्यांचे वर्चस्व पूर्वीइतके अभेद्य राहिलेले नाही. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत जेनिफर मोन्सेरात यांनी अवघ्या २,०४१ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी रोहित मोन्सेरात किंवा भाजपचा अन्य उमेदवार असला, तरी विजयासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा