नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला महापूर; शेकडो लोक बेपत्ता

नेपाळमधील भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे १०५ भारतीयांसह शेकडो लोक बेपत्ता झाले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे अफाट नुकसान झाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
11 mins ago
नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला महापूर; शेकडो लोक बेपत्ता

काठमांडू  : नेपाळच्या उत्तरेकडील सीमेवर भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक महापुरामुळे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून १०५ भारतीय पर्यटकांसह किमान २९१ परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे मिळून सुमारे ४१ सुरक्षा कर्मचारी देखील पुराच्या प्रवाहात बेपत्ता झाले आहेत.

बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीत अचानक पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू झाला, ज्यामुळे तिमुरे आणि स्याफ्रु बेसी हे भाग जलमय झाले. पुराच्या प्रचंड वेगामुळे रसुवागढी येथील नव्याने बांधलेला 'मैत्री पूल', अनेक घरे, बाजारपेठा, रस्ते आणि वाहने वाहून गेली आहेत. या दुर्घटनेचा मोठा फटका नेपाळच्या ऊर्जा क्षेत्राला बसला असून, अनेक जलविद्युत प्रकल्प ठप्प झाल्याने सुमारे ४३० मेगावॉट विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. हा पूर हिमनगाचे सरोवर फुटल्याने आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

या आपत्तीचे पडसाद शेजारील चीन आणि भारतामध्येही उमटले आहेत. तिबेटमधील ग्यारोंग भागात दरड कोसळल्याने तेथील दळणवळण आणि वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शोधमोहीम वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, हे पाणी त्रिशुली नदीतून पुढे भारताच्या गंडक आणि कोसी नदी प्रणालीत प्रवेश करत असल्याने बिहारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सीमावर्ती जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन लष्कर आणि आपत्कालीन पथकांना बचावकार्यासाठी तैनात केले आहे. मात्र, नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढल्यामुळे अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवण्यात अडचणी येत आहेत. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा
सर्व पहा