Home >> ताज्या बातम्या >> मडगाव ईस्टर्न बायपाससाठी ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव

मडगाव ईस्टर्न बायपाससाठी ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव

केंद्राकडे निधीची मागणी : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th July, 10:46 pm
मडगाव ईस्टर्न बायपाससाठी ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव

मडगावातील अंबाजी सर्कल ते दवर्ली पॉवर हाऊसदरम्यान ईस्टर्न बायपास उभारण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. बोरी पुलासह या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

मडगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सध्या वेस्टर्न बायपासचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर शहराच्या पूर्वेकडील भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा ईस्टर्न बायपास उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ‘आर्ले एलिव्हेटेड कॉरिडॉर’ असे नाव दिले जाणार असून, त्याची उभारणी अंबाजी सर्कलपासून दवर्ली पॉवर हाऊसपर्यंतच केली जाईल. याची अंदाजित किंमत ८०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.

बांधकाम आणि देखभालीची एकत्रित निविदा

एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीसह पुढील १५ वर्षे त्याची देखभाल करण्याचाही समावेश निविदेत करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम आणि देखभाल अशा दोन्ही कामांसाठी एकत्रित निविदा काढली जाणार आहे. नुवे ते धर्मापूर-नावेली या ११.९ किलोमीटर लांबीच्या वेस्टर्न बायपासमुळे मडगाव शहरातील वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याच धर्तीवर आता हा ईस्टर्न बायपास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोरी पुलासाठी २ हजार कोटींचा खर्च!

बोरी पुलाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) वेर्णा मिसिंग लिंक ते बोरी या रस्त्याचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची निविदा सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुलाच्या बांधकामासोबतच पुढील १५ वर्षे त्याची देखभाल करण्याची जबाबदारीही कंत्राटदारावर असेल.

बोरीचा चौपदरी पूल आणि मडगाव ईस्टर्न बायपास हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून आहेत. केंद्राकडून निधी मंजूर झाल्यास हे दोन्ही प्रकल्प वेगाने पूर्ण होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पणजी येथे बुधवारी झालेल्या ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री अजय तामता आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी या दोन्ही प्रकल्पांबाबत अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा
सर्व पहा