Home >> गोवा >> पावसाने दडी मारल्याने विहिरीच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ

पावसाने दडी मारल्याने विहिरीच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ

ऐन हंगामात वाढला सिंचनाचा खर्च : तांबोसे येथील शेतकरी दयानंद गवंडी यांची व्यथा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
33 mins ago
पावसाने दडी मारल्याने विहिरीच्या पाण्यावर शेती करण्याची वेळ

पेडणे : पावसाळा सुरू होऊनही गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने पेडणे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर शेतीचे मोठे संकट उभे राहिले आहे. तांबोसे येथील शेतकरी दयानंद गवंडी यांच्यावर तर पावसाअभावी विहिरीला पंप लावून शेती करण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला कृत्रिम सिंचनाचा आधार घ्यावा लागत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.

दयानंद गवंडी यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यानंतर नियमित पाऊस पडेल, या आशेवर त्यांनी शेतीची तयारी केली होती. मात्र, गेल्या महिनाभरात पावसाने दडी मारल्याने शेती कोरडी पडू लागली. रोपे वाचविण्यासाठी अखेर विहिरीला पंप बसवून पाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्यथा संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

सध्या शेतकऱ्यांना वीज, डिझेल, मजुरी आणि सिंचनाचा वाढता खर्च सहन करावा लागत आहे. नैसर्गिक पाऊस न पडल्यास हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, लहान शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जुलै महिन्यात नियमित पाऊस न झाल्यास भात लागवड, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगला पाऊस होणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते सांगत आहेत.

दरम्यान, तांबोसेसह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अशा संकटांना तोंड देण्यासाठी सिंचन सुविधा बळकट करण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


हेही वाचा
सर्व पहा