Home >> गोवा >> गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव रेल्वे स्थानकावर युपीच्या युवकाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव रेल्वे स्थानकावर युपीच्या युवकाला अटक

कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई; ३७,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27 mins ago
गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव रेल्वे स्थानकावर युपीच्या युवकाला अटक

मडगाव : येथील मडगाव रेल्वे स्थानकावर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका संशयित युवकाला अटक केली आहे. अमन शिकरवार (वय २०, रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ३७,९०० रुपये किमतीचा ३७९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव रेल्वे स्थानकावर अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे १४ जुलै रोजी कोकण रेल्वे पोलिसांच्या पथकाने मडगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पाळत ठेवली होती. संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या अमन याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगलेला ३७९ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली.

ही कारवाई कोकण रेल्वे पोलीस उपनिरीक्षक रुझवेल्ट फर्नांडिस, कॉन्स्टेबल वसीम शेख, वासिम शेख आणि आकाश सिंग यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, पोलीस उपअधीक्षक हिरू कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा